विश्वास पुरोहित, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव ठरल्याचा दावा करणारी भाजपाची जाहिरात आठवतेय… या जाहिरातीत हरिसाल गावातील मनोहर खडके हा तरुण झळकला होता. होय, मी लाभार्थी असे म्हणणाऱ्या मनोहरने आता गावातील दुकान बंद केले आहे. जाहिरातीनंतर मनस्तापाचा सामना करावा लागल्याने पुण्यातच कायमस्वरुपी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे मनोहरने म्हटले आहे.

भाजपा सरकारने गेल्या वर्षी ‘मी लाभार्थी, होय हे माझं सरकार’, अशी जाहिरात केली होती. या जाहिरातीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव भारतातील पहिले डिजिटल गाव ठरल्याचे सांगण्यात आले होते. या गावातील मनोहर खडके हा तरुणही या जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत झळकलेला मनोहर सध्या काय करतो, याचा शोध घेतला असता धक्कादायक प्रकार समोर आला.

हरिसाल गावात मनोहर खडके या तरुणाचे छोटेसे दुकान होते. दुकानात त्याने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. ऑनलाइन बिल भरणा, पैसे ट्रान्सफर करणे अशी विविध कामं तो करुन द्यायचा. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्याने दुकान बंद केले आहे. मनोहरशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने सध्या पुण्यात वास्तव्य करत असल्याचे सांगितले.
“भाजपाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर गावात मी चर्चेचा विषय ठरलो. काही तरुणांनी माझी खिल्ली उडवली. ती लोक मला येता-जाता ‘काय लाभार्थी?’ अशी हाक मारायचे. तर सरकारी अधिकारी दुकानासमोर येऊन सेल्फी काढायचे. याशिवाय माध्यमांचे प्रतिनिधीही वारंवार दुकानात येऊन प्रश्नांचा भडीमार करायचे. या साऱ्या प्रकारामुळे मला प्रचंड मनस्ताप व्हायचा. अखेर मी पुण्यात निघून आलो”, असा दावा मनोहरने केला आहे.

“माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या आधारे पुण्यात नोकरी शोधत असून आता गावात जायची इच्छाच होत नाही. जाहिरातीनंतर मी लाभार्थी आहे की नाही, याचीच चर्चा जास्त आहे. पण मी गावातील मानसन्मान गमावला. तो कसा परत मिळवू, असा सवाल मनोहरने विचारला. मला हल्ली इतके फोन येऊ लागलेत, की नवीन सिम कार्ड घ्यावासा वाटतो, असेही तो सांगतो. मात्र, मनोहरला नेमका लाभ काय मिळाला, याचे उत्तर देणे त्याने टाळले.

मनोहरने तो पुण्यात असल्याचा दावा केला असला तरी गावातील ग्रामस्थांशी चर्चा करताना मनोहर नेमका कुठे आहे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. काही ग्रामस्थांनी मनोहर तालुक्यातच असल्याचे सांगितले. तर काही ग्रामस्थांनी मात्र, मनोहर पुण्यात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

मनोहर नेमक्या कोणत्या योजनेचा लाभार्थी होता, याची विचारपूस केली असता गावातील सरपंच सांगतात, मनोहरला मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळाले आणि यातूनच त्याने दुकान घेतले होते. मात्र, त्या जाहिरातीचा आमच्याशी काहीच संबंध नाही. तर एका तरुणाने दिलेल्या माहितीनुसार गावात सेतू केंद्र सुरु झाले. त्यामुळे मनोहरच्या दुकानातील ग्राहक कमी झाले. लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने मनोहर पुण्यात गेला, असे गावातील तरुणाचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोहर जाहिरातीत कसा झळकला?
गावातील डिजिटल योजनेशी संबंधित अधिकाऱ्यामुळे मनोहर या जाहिरातीत झळकल्याचे समजते. या अधिकाऱ्याने मनोहरला जाहिरातीबाबत माहिती दिली आणि यानंतर मुंबईतील जाहिरात कंपनीने मनोहरशी संपर्क साधला. या जाहिरात कंपनीची एक टीम हरिसाल गावात आली होती आणि त्यांनी शुटिंगसाठी मनोहरला बाहेरगावी नेले होते, असे ग्रामस्थ सांगतात. या जाहिरातीत काम करु नको, असा सल्ला त्याला अनेकांनी दिला होता. पण मनोहरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अखेर ही जाहिरात त्याच्यासाठी तापदायक ठरली, असेही ग्रामस्थ सांगतात.