देशात चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून त्यात भाजपानं तीन राज्यांमध्ये काँग्रेसला पराभूत केलं आहे. त्यामुळे काँग्रेसची निवडणूक रणनीती व पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठीची समीकरणं यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सीचा घटक महत्त्वाचा ठरल्याचं वरकरणी सांगितलं जात असलं, तरी या पराभवाची सखोल कारणमीमांसा काँग्रेसमध्ये चालू झाल्याचं दिसत आहे. त्यातच खुद्द अशोक गहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनीच एक्सवर (ट्विटर) केलेल्या सविस्तर पोस्टमधून गहलोत यांच्या कामगिरीवर तोफ डागली आहे.

काय झालं राजस्थानमध्ये?

राजस्थानमध्ये भाजपाला ११५ जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसला अवघ्या ६९ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसचं झालेलं पानिपत चर्चेचा विषय ठरलं आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी मतांचा टक्का वाढवण्यात अपयश आल्याचं कारण सांगितलं असताना लोकेश शर्मा यांनी मात्र या सगळ्या पराभवाला एकट्या अशोक गहलोत यांना जबाबदार धरलं आहे. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट केली आहे. तसेच, त्यात २५ सप्टेंबरच्या एका घडामोडीचा उल्लेख करत या सगळ्याला तेव्हापासूनच सुरुवात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

anurag thakur statement on rahul gandhi
“राहुल गांधींचं लग्न झालं नाही, म्हणून तुमच्या मुलांची संपत्ती ते…”, अनुराग ठाकूर यांचं विधान
bjp attacks congress over sam pitroda wealth distribution remark
भाजपच्या हाती पित्रोदांच्या‘वारसा करा’चे कोलीत; भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसची अडचण
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

“निकालांचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही”

“लोकशाहीत जनताच मायबाप आहे आणि जनादेश शिरसावंद्य आहे. तो विनम्रतेनं आम्ही स्वीकारत आहोत. मला या निकालांमुळे वाईट तर नक्कीच वाटलं आहे, पण आश्चर्य वाटलेलं नाही. काँग्रेस पक्ष राजस्थानमध्ये नक्कीच परंपरा बदलू शकत होता. पण अशोक गहलोत यांना कधीच कुठला बदल नको होता. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाचा नाही, तर अशोक गहलोत यांचा पराभव आहे. गहलोत यांच्या चेहऱ्यावर, त्यांना मुक्तहस्त देऊन, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं निवडणुका लढल्या. गहलोत यांना असं वाटत होतं की प्रत्येक जागेवर ते स्वत:च निवडणूक लढवत आहेत. पण या निवडणुकीत ना त्यांचा अनुभव कामी आला, ना जादू”, असं लोकेश शर्मा यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

गहलोत यांची मनमानी काँग्रेसला भोवली?

“सलग तिसऱ्यांदा गहलोत यांनी मुख्यमंत्री असून पक्षाला काठावर आणून सोडलं आहे. आजपर्यंत त्यांनी पक्षाकडून फक्त घेतलं आहे. पण ते सत्तेत असताना कधीच पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकलेले नाहीत. पक्षातील हायकमांडला फसवून, त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचू न देता, दुसरा कुठलाही पर्याय उभा राहू न देणं, स्वार्थी लोकांमध्येच राहून सातत्याने चुकीचे आणि गडबडीत निर्णय घेणं, सर्व प्रकारच्या अंदाजांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने आणि आपल्या आवडत्या उमेदवारांनाच त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असूनही तिकीट देण्याचा हट्ट करणे अशा गोष्टी पराभवासाठी कारणीभूत ठरल्या”, असंही शर्मा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता का गेली? पक्षाच्या कोअर कमिटीचे ‘प्रोफेसर’ सी. पी. जोशींनी सांगितलं कारण!

“असा निकाल लागणार हे स्पष्टच होतं. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना याबाबत आधी सांगितलं होतं. अनेकदा सतर्क केलं होतं. पण त्यांना असा कुणीही व्यक्ती किंवा सल्ला त्यांच्या आसपासही नको होता जो खरं सांगेल”, असंही लोकेश शर्मांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

लोकेश शर्मांना लढवायची होती निवडणूक

दरम्यान, आपल्याला निवडणूक लढवायची इच्छा होती, असं लोकेश शर्मांनी सांगितलं आहे. “मी सहा महिने राजस्थानच्या गावागावांत फिरलो. लोकांना भेटलो, हजारो तरुणांशी संवाद कार्यक्रमांमधून चर्चा केली. जवळपास १२७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन मी एक सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. सत्य परिस्थितीचं वास्तवदर्शी विश्लेषण त्यांच्यासमोर ठेवलं. जेणेकरून वेळीच योग्य ती पावलं उचलता येतील आणि पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकेल. मी स्वत:देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधी बिकानेरचा पर्याय दिला. पण नंतर मुख्यमंत्र्यांच्याच सांगण्यावरून भिलवाडाचाही पर्याय दिला. या मतदारसंघात आम्ही गेल्या २० वर्षांपासून पराभूत होत आहोत. पण ते नवीन काही करू शकले नाहीत”, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

“बी. डी. कल्ला हे २० हजारांहून जास्त मतांनी पराभूत होतील, हे मी सहा महिन्यांपूर्वीच सांगून ठेवलं होतं. तेच घडलं. अशोक गहलोत यांच्याकडून अशा प्रकारे निर्णय घेतले गेले की दुसरा कुठला पर्याय उभाच राहू शकणार नाही. २५ सप्टेंबरला जेव्हा पक्षाच्या हायकमांडविरोधात बंड करून हायकमांडचा अपमान करण्यात आला, त्याच दिवसापासून खेळ सुरू झाला होता”, अशा सूचक शब्दांत लोकेश शर्मा यांनी गंभीर दावा केला आहे.

काय घडलं होतं २५ सप्टेंबरला?

२५ सप्टेंबर २०२२ रोजी राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेस हायकमांडला देण्यात आले. सचिन पायलट यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता तेव्हा वर्तवली जात होती. पण या बैठकीवर गहलोत यांच्या समर्थक आमदारांनी बहिष्कार घातला. पण हा बहिष्कार आमदारांनी उत्स्फूर्तपणे घातला नव्हता, तर स्वत: गहलोत यांनीच ते सगळं घडवून आणलं होतं, असा दावा शर्मा यांनी केला आहे.