शरद पवार आज सांगली दौऱ्यावर असून तिथे सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच, त्यांनी काही कळीच्या मुद्द्यांवर मिश्किल टिप्पणी करत टोलेबाजीही केली. पत्रकार परिषदेच्या शेवटी माध्यम प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी खोचक भाष्य केलं. त्याचवेळी तिसऱ्या आघाडीवर बोलतानाही त्यांनी टोला लगावला.

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून टोलेबाजी

महाविकास आघाडीकडून यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? याची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. त्याबाबत आज शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी एक म्हण सांगत यावर टिप्पणी केली.

“एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी. कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवायचं तर त्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत मिळालं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल. जयंत पाटील कधी असं बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात”

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी विनंती केली. अमित शाह यांचे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र दौरे वाढल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात पंतप्रधानांनी लोकसभेवेळी १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झाला. असं होत असेल, तर आमची विनंती आहे की पंतप्रधानांनी विधानसभेत जास्त वेळा महाराष्ट्रात यावं. इथे आणखी सभा घ्याव्यात”!

Sharad Pawar: पत्रकाराच्या ‘या’ प्रश्नावर शरद पवारांनी चमकून विचारलं, “मी?”; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर केलं सूचक भाष्य!

तिसऱ्या आघाडीमुळे झोप उडाली?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी, महायुती यांच्याबरोबरच आता तिसरी आघाडीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यामध्ये संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी व बच्चू कडू यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे यांच्या पक्षांमुळेही राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक थेट न होता तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत मिश्किल टिप्पणी केली.

Third Front in Maharashtra Assembly Election 2024: तिसऱ्या आघाडीचा घाट केवळ अहंभावामुळे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या आघाडीचा यंदाच्या निवडणुकीत परिणाम दिसेल का? असं विचारलं असता त्यांनी त्यावर भाष्य केलं. “कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणारच. त्यामुळे संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार आहेत. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपलं काय होणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे”, असं पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.