भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ८ मे) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर सोनिया गांधी यांच्या एका विधानाचा उल्लेख करून ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये त्या म्हणतात, “कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला आम्ही धोका पोहोचवू देणार नाही.” या विधानाची तक्रार करण्यासाठी भाजपाने एक शिष्टमंडळ गठित केले असून त्याचे प्रमुख केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आहेत. यादव माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, तुकडे तुकडे गँगचा अजेंडा पुढे नेण्याचे काम काँग्रेसकडून होताना दिसत आहे. काँग्रेसने भारताची अखंडता आणि एकात्मतेच्या विरोधात वक्तव्य केले असल्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी. तसेच सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाच्या तक्रारीत करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूपेंद्र यादव पुढे म्हणाले की, काँग्रेसने आपल्या जाहिरातीमध्ये जे दावे केले, त्याबद्दलचे पुरावे निवडणूक आयोगाकडे जमा केलेले नाहीत. कर्नाटक सरकारने प्रत्येक कामासाठी दर निश्चित केले आहेत, असा आरोप काँग्रेसने जाहिरातीमधून केला होता. या जाहिरातीवर आक्षेप घेत भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ६ मे रोजी निवडणूक आयोगाने एक नोटीस काढून कर्नाटक काँग्रेसप्रमुखांना या आरोपाबाबतचा पुरावा ७ मे पर्यंत जमा करण्यास सांगितले होते. तसेच ८ मे रोजी निवडणूक आयोगाने एक सूचना काढून सर्वच राजकीय पक्षांना जाहिराती प्रसिद्ध करण्याआधी पूर्वप्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, याची आठवण करून दिली.

हे वाचा >> Karnataka : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदींचे भावनिक आवाहन; प्रियंका गांधी म्हणाल्या, “पंतप्रधानांना विकासचा विसर”

भाजपाने आज निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार ही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केली आहे. आज (८ मे) सायंकाळी ६ वाजता राज्यातील प्रचार थांबवावा लागणार आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची व्याख्या लिहिली आहे. भारत हा सार्वभौम देश असून कर्नाटक त्याचा एक भाग आहे. सोनिया गांधी यांचे वक्तव्य धक्कादायक आणि अयोग्य असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री शोभा करंदालजे यांनी केला. सोनिया गांधी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर अशा वक्तव्यासाठी कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

शोभा करंदालजे या भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संयोजक आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना सांगितले की, सोनिया गांधी यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी.

हे ही वाचा >> Video : कर्नाटकच्या प्रचारात ‘द केरल स्टोरी’चा तडका, भाजपा अध्यक्ष नड्डा यांची विद्यार्थिनींसह चित्रपटाला हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सोनिया गांधी यांच्यावर टीका

सोनिया गांधी यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संताप व्यक्त केला. रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की, “काँग्रेसच्या शाही परिवाराने कर्नाटकच्या निवडणुकीत आपली पातळी ओलांडली आहे. देशाच्या भावना आणि परंपरांना त्यांनी नख लावले आहे. मी दुःख व्यक्त करीत सबंध हिंदुस्थानवासीयांना सांगू इच्छितो की, काल शाही परिवाराने कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची भाषा वापरली. याचा अर्थ तुम्हाला कळला का? जेव्हा एखाद्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होते, तेव्हा तो देश सार्वभौम देश असल्याचे मानले जाते. काँग्रेस कर्नाटकला जेव्हा सार्वभौम म्हणते, याचा अर्थ कर्नाटक भारतापेक्षा वेगळा आहे, असे काँग्रेसला सुचवायचे आहे का,” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी सभेत उपस्थित केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp files complaint with election commission against sonia gandhis sovereignty of karnataka remark kvg
First published on: 08-05-2023 at 16:36 IST