लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदान संपेल. यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. अशात एक्झिट पोल्स म्हणजे निकालाचे अंदाज आज संध्याकाळी ६.३० पासून सुरु होतील. विविध वृत्तवाहिन्यांवर हे अंदाज वर्तवले जाणार आहेत. त्यानंतर याबाबत चर्चाही होईल. या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संध्याकाळी ६.३० पासून सुरु होणार एक्झिट पोल्स

निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान पार पडतं आहे. हे मतदान संध्याकाळी ६ वाजता संपेल आणि त्यानंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील. संध्याकाळी ६.३० पासून एक्झिट पोल्स यायला सुरुवात होतील. या संदर्भातल्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याबाबत अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- Lok Sabha Exit Poll 2024: एक्झिट पोलची उत्सुकता, कधी जाहीर होणार? काय असेल वेळ? जाणून घ्या

अमित शाह काय म्हणाले?

“लोकसभा मतदान सुरु झालं त्या दिवसापासूनच काँग्रेस पक्ष नकारात्मक मूडमध्ये आहे. लोकसभेसाठी ज्या प्रचारसभा काँग्रेसने घेतल्या त्यात त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आलं की त्यांनाच बहुमत मिळेल. पण त्यांना हे पक्कं ठाऊक आहे की त्यांचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही एक्झिट पोल्सनंतरच्या चर्चांमध्ये सहभाग घेणार नाही. राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होणार आहे हे पटल्यानेच काँग्रेसने एक्झिट पोल्सवर बहिष्कार घातला आहे. मी तर त्यांना सल्ला देईन की त्यांनी अशा प्रकारे पलायन करु नये उलट आत्मचिंतन केलं पाहिजे. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवन खेरा यांची पोस्ट काय?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. १ जून रोजी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलसंदर्भात माध्यमांवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होईल, तेव्हा तो निकाल सर्वांसमोर असेल. केवळ माध्यमांच्या टीआरपीसाठी अशा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याचं समर्थन आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ४ जूनच्या निकालानंतर माध्यमांवर होणाऱ्या चर्चेत काँग्रेस पक्ष आनंदाने सहभागी होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. यानंतर अमित शाह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.