गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मोठ्या संख्येने मतदान झालं आहे. यानंतर काँग्रेसने गोव्यात बहुतमाने आपलं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, गोव्यात ४० विधानसभा जागांसाठी सोमवारी ७८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गोवा हे देशातील सर्वात छोटं राज्य असून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे आहेत. उत्तर गोव्यात सर्वाधित ७९ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदानाची नोंद झाली.

या आकडेवारीवरुन काँग्रेसने निवडणुकीचा निकाल काय असेल याचा अंदाज बांधला आहे. १० मार्चला निकालाची घोषणा होणार आहे. एएनआयशी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) गोव्याचे प्रभारी दिनेश राव यांनी म्हटलं की, “निर्णायक मत देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे आले असून त्याची प्रचिती निकालात दिसून येईल”.

यावेळी त्यांनी भाजपाशासित राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधातील लाट असून लोक भाजपाला बाहेर काढतील असा विश्वास व्यक्त केला. “सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट असून यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. मला वाटतं काँग्रेससाठी हा चांगला निकाल असणार असून बहुमत मिळेल. तळागाळाला काम कऱणारे आमचे लोकही हेच सांगत आहे,” असं ते म्हणाले.

तसंच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात नाराजी असल्यानेच त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झालं असल्याचा दावा त्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट असल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक हारणार हे माहिती असल्यानेच ते दारोदारी जाऊन प्रचार करत होते. त्यांच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होणं आमच्यासाठी चांगलं आहे. आमचा उमेदवार विजयी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्यात काँग्रेस गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करत ही निवडणूक लढत आहे. या युतीचा फायदा होत बहुमत मिळेल असा विश्वास त्यांना आहे. “गोव्यातील लोकांना स्थिर सरकार हवं असून बहुमताने सरकार निवडून आणायचं आहे. राज्यातील आयाराम गयाराम राजकारण त्यांना बदलायचं असून एक शांत वादळ निर्माण होत होतं. आम्हाला २० पेक्षा जास्त जागा मिळतील आणि भाजपा एक आकडी संख्याही पार करुन शकणार नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.