कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणं अद्याप बाकी आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडलं, तर ते बदलत असतं. यावेळी आम्ही कल तोडू शकेल, असं वाटतं होतं. पण, तसं झालं नाही. २०१८ साली भाजपाच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाले होती. आता भाजपाला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते भाजपाची कमी झाली आहेत. तसेच, ४० जागाही कमी झाल्यात,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाची पिछेहाट, ठाकरे गटाच्या खासदाराने ट्वीट करत डिवचलं; म्हणाल्या, “हनुमानाने सुद्धा…”
“भाजपाची मते कुठेही कमी झालेली नाहीत”
“२०१८ साली काँग्रेसला ३८ टक्के, तर जेडीएसला १८ टक्के मते मिळाली होती. जेडीएसची ५ टक्के मते कमी झाली आहेत. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला विजय झाला आहे. भाजपाची मते कुठेही कमी झालेली नाहीत,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात…”
“काही लोकांना असं वाटत आहे, जवळपास ते देशच जिंकले आहेत. त्यांना एवढाच सल्ला आहे, की पूर्वीचे विधानसभा आणि नंतर लोकसभेचे निकाल पाहिले पाहिजेत. आजच उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले आहेत. याठिकाणी भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही,” असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.
हेही वाचा : निकाल कर्नाटकचा, घडामोडी महाराष्ट्रात; शरद पवारांची पुढची रणनीती तयार? पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी स्वत:…!”
“महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार”
“कर्नाटकातील निवडणुकीचा कोणताही परिणाम देशात आणि महाराष्ट्रात होणार नाही. देशात मोदींचं आणि महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.