दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून जामिनावर बाहेर आहेत. २ जूनपर्यंत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना तुरुंगात जावं लागेल. मात्र, यादरम्यान प्रचारसभा व मुलाखतींमधून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर व भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. मात्र, दुसरीकडे आपनं इंडिया आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या काँग्रेसला हरवून केजरीवाल दिल्लीत विजयी झाले, त्याच काँग्रेससोबत ते इंडिया आघाडीत दाखल झाले. मात्र, आता काँग्रेसशी घरोबा कायमचा नाही असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

आम आदमी पक्षानं दिल्लीत आणि नंतर पंजाबमध्येही काँग्रेसचा पराभव करून सत्ता हस्तगत केली. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी स्थापन झालेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्ष सहभागी झाला. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसशी सलोखा केल्याची टीका होऊ लागली. मात्र, तरीही केजरीवाल यांनी मोदींचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं जाहीर केलं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसनं निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेतल्या. पण आता केजरीवाल यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

अरविंद केजरीवाल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. आप आणि काँग्रेसची कायमस्वरूपी आघाडी नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत. “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे”, असं केजरीवाल म्हणाले.

गांधी कुटुंबियांबरोबर संबंध कसे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राहुल गांधींना फोन…’

“सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आघाडी आवश्यक होती, तिथे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आली आणि दोघांचा मिळून एक उमेदवार उभा केला. पंजाबमध्ये भाजपाचं अस्तित्वच नाहीये. म्हणून पंजाबमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो”, असंही अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं.

“योगी आदित्यनाथ यांच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह”

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी योगी आदित्यनाथ यांच्याबाबतच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तारूढ झाले, तर योगी आदित्यनाथ यांच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील. भारतीय जनता पक्षानं या भूमिकेचा इन्कार करून दाखवावा”, असं आव्हानच योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.