आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आता येत्या काळात त्यांच्या आणखी सभा, रॅलीज होतील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. चंद्रयान मोदींच्या आशीर्वादाने चंद्रावर उतरलं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसंच राहुल गांधींवरही जोरदार टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला अतिशय आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात चंद्रपूरपासून केली. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत आपला विजय कुणीही थांबवू शकत नाही. आपण सगळ्यांनी आई महाकालीला नमन केलं आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

राहुल गांधींवर टीका

“काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात ‘मुझे हिंदू समाजमें जिसे शक्ती कहा जाता है उस शक्ती को समाप्त करना है.’ अरे नादान राहुल गांधींना सांगा, आई महाकालीला समाप्त करण्याचं स्वप्न धुळीला मिळेल. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत आमची शक्ती कुणीही संपवू शकत नाही. “

हे पण वाचा- “काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद्रयान मोदींच्या आशीर्वादाने चंद्रावर पोहचलं

“आज मोदींच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळतो आहे. मोदींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान हे माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात, मोदींच्या आशीर्वादाने थेट संसदेत उतरणार आहे. त्याच यानात आमचे अशोक नेते बसलेले असतील. दोन्ही नेते तुमच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत पोहचलेले असतील. आपल्याला कल्पना आहे की सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट केला तर अशोक नेतेंनी उत्तम सेवा केली आहे. मी इतकीच विनंती करायला आलो आहे चंद्रपूरचा कायापालट करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवायचं आहे. अशोक नेतेंनाही पाठवा” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.