गोव्यात भाजपाला बहुमत मिळालं असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोवा भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला, असता फडणीस यांनी गोव्यातील निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत, असं म्हणत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा देखील साधला.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “मागील वेळेपेक्षाही जास्त मतं आम्ही मिळवले आहेत. याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ कोणत्या मत विभागणीवरून आलेलो नाहीत. सकरात्मक मतांवर भाजपा निवडून आलेली आहे आणि मला गोष्टीचा देखील आनंद आहे, की आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले आहेत. मला विश्वास आहे गोव्यात एक चांगलं सरकार आम्ही स्थापन करू.”

तर, “मी पहिल्या दिवशीच हे सांगितलं होतं, की शिवसेनेची लढाई ही आमच्याशी नाहीए ती लढाई नोटाशी आहे. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती होती, या दोघांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत. त्यामुळे मी जे सांगितलं होतं ते सत्य आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात जाऊन त्यांनी, मोठी सभा घेतली. त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला ९७ मतं मिळाली आहेत, १०० देखील मिळू शकलेली नाहीत.” असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर गोव्यात भाजपाची सत्ता येणार नाही लिहून घ्या असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचार काळात केला होता, त्याची आठवण माध्यम प्रतिनिधीने करून दिल्यावर फडणवीस म्हणाले, “आता संजय राऊत यांनाच विचारा तुम्ही जे लेखी दिलं होतं त्याबद्दल तुम्हाला काय शिक्षा, द्यायची.” तसेच,“काँग्रेसला आत्मचिंतर करण्याची गरज आहे आणि विशेषता परिवारवादी जे पक्ष आहेत, त्यांना एक मोठा धडा या निवडणुकीने शिकवला आहे.” असं म्हणत काँग्रेस, समाजवादी पार्टीच्या अपयशावर फडणवीसांनी टिप्पणी केली.

तर, “आम्ही निवडणूक प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढलो आहोत. आता सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील निर्णय मी करत नसतो, आमचं केंद्रीय संसदीय मंडळ करत असतं.” अशी माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.