देशात सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झाल्याचं दिसत आहे. प्रामुख्याने गोवा व उत्तर प्रदेश येथील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण, या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी, महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर , गोव्यात पुन्हा एकदा भाजपाच सरकार स्थापन करणार असल्याचं भाजापचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलेला आहे. दरम्यान, आता सर्वच राजकीय पक्षांकडून उमदेवारी याद्या जाहीर करणं सुरू झालं आहे. गोव्यात भाजपाचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरक यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे पणजी मतदार संघातून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र भाजपा त्यांना उमेदवारी देण्याच्या विचारात नसल्याचं दिसत आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
उत्पल पर्रिकरांना पणजीमधून भाजपा उमेदवारी देणार की नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “उत्पल पर्रिकरांचे वडील मनोहर पर्रिकर हे गोव्यातील प्रमुख नेते होते, भाऊसाहेब बांदोडकरानंतर गोव्यावर मोठा प्रभाव असलेले नेते होते. या गोव्यात भाजपाचं संघटन वाढवण्यात रूजवण्यात पर्रिकरांचा महत्वाचा वाटा होता. पर्रिकरांनी गोव्याला आकार देण्याचा प्रयत्न केला, विकास केला नक्कीच. पर्रिकरांकडे दूरदृष्टी होती, गोव्या सारख्या लहान राज्यातील हा माणूस देशाचा संरक्षणमंत्री झाला. पण त्यांच्या मृत्यू नंतर जेव्हा त्यांच्या मुलाने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला जातोय, अपमानित केलं जातय. हे गोव्याच्या जनतेला काही आवडलेलं नाही. पण शेवटी निर्णय कोणी घ्यायचा आहे, तर उत्पल पर्रिकरांनी घ्यायचा आहे. हिंमत दाखवा, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही लढायला समोर या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. घरात बसून लढाया होत नाहीत किंवा कागदावर चार भिंतींमध्ये, तुम्ही हिंमत असेल तर समोर या. आव्हान द्या. मी खात्रीने सांगतो जर उत्पल पर्रिकर लढण्यासाठी बाहेर पडले आणि पणजीमध्ये निवडणुकीसाठी उभा राहिले, तर ते निवडून येतील आणि गोव्याची जनता त्यांच्या पाठीशी राहील.” एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.
तसेच, “उत्पल पर्रिकरांना सर्वोतोपरी शिवसेना मदत करणार, ते सांगतील ती मदत करू. आम्हीच कशाला इतर देखील अनेक पक्ष मदत करतील. पर्रिकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलिकडचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि ते धाडसाने पुढे येऊन काही करणार असतील, तर शिवसेनाच कशाला इतर देखील समाज, इतर देखील राजकीय पक्ष उत्पल पर्रिकरांना मदत करतील.” असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष केवळ कोणी राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट देऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर उत्पल पर्रिकरक यांनी, “मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने जे म्हटले आहे त्यावर टिप्पणी नाही करू शकत. मात्र मी मनोहर पर्रिकर यांचा मुलगा आहे म्हणून मला जर तिकीट मागायचं असतं, तर पर्रिकरांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीतच तिकीटाची मागणी केली असती.” असं बोलून दाखवलं होतं.
तर, “मी पक्षाला आधीच सांगितले आहे की मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे आणि मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल,” असे उत्पल पर्रिकर यांनी या अगोदरच बोलून दाखवलेले आहे. दरम्यान, सध्या या जागेचे प्रतिनिधित्व करणारे अतानासियो मोन्सेराते इतर नऊ आमदारांसह भाजपामध्ये सामील झाले आहेत. ज्यांनी २०१७ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती.