उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार टी राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करून, जे योगी आदित्यनाथ यांना मतदान करणार नाहीत त्यांच्यासाठी हजारो बुलडोझर बोलवण्यात आले आहेत, असे म्हटले आहे.

भारत माता की जय आणि जय श्रीरामच्या घोषणांनी सुरुवात करत भाजपा आमदाराने हे वक्तव्य केले आहे. “काही भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. मला समजले आहे की ज्यांना योगीजी आवडत नाहीत त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. मी उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करतो. भाजपाला मत न देणाऱ्यांसाठी योगीजींकडे हजारो जेसीबी आणि बुलडोझर आहेत, असे राजा सिंह म्हणाले.

“जे लोक भाजपाला मतदान करत नाहीत त्यांना मला सांगायचे आहे की, योगी आदित्यनाथ यांनी हजारोंच्या संख्येने जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत. ते उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत. निवडणुकीनंतर ज्यांनी ज्यांनी योगी आदित्यनाथ यांना समर्थन दिलेले नाही त्या सर्व भागांतील लोकांची ओळख पटवण्यात येईल आणि माहिती आहे ना जेसीबी आणि बुलडोझर कशासाठी वापरतात. मला उत्तर प्रदेशच्या त्या देशद्रोह्यांना सांगायचे आहे ज्यांना योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री नको आहेत. तुम्हाला उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर तुम्हाला योगी-योगी म्हणावे लागेल. अन्यथा तुम्हाला उत्तर प्रदेश सोडावे लागेल,” असे भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५५ जागांवर सोमवारी ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, जे पहिल्या फेरीपेक्षा जास्त आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ६० टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या फेरीत मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये जास्त मतदान झाले आहे. तर बरेली, शाहजहांपूर आणि बदायूंसारख्या जिल्ह्यांमध्ये मतदान तुलनेने कमी आहे, जिथे मुस्लिम लोकसंख्या २५ टक्क्यांहून कमी आहे. अशा स्थितीत हा आकडा भाजपाची चिंता वाढवू शकतो. मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे निकालाबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येत नसले तरी तो कल मानला जाऊ शकतो.