बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून विरोधकांनी कंगना आणि भाजपावर निशाणा साधला आहे. तर, काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टा खात्यावरून कंगनाचा एक अश्लिल फोटो पोस्ट झाला होता. या फोटोवरून आता सोशल मीडियावर रान उठलं असून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौतला उमेदवारी जाहीर झाली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणौत यांचा एक अर्धनग्न फोटो पोस्ट करून त्यांच्यावर अश्लिल टिप्पणी केली होती. एका महिला नेत्यानेच महिला उमेदवारावर अश्लिल टीका केल्याने भाजपाने संताप व्यक्त केला. तर, कंगना रणौत यांनीही सुप्रिया यांच्यावर पलटवार केला.

हेही वाचा >> अभिनेत्री कंगना रणौत राजकारणात! भाजपाने ‘या’ मतदारसंघातून दिलं लोकसभेचं तिकिट

कंगना राणौत काय म्हणाली?

कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. क्वीनमधील एका भोळ्या मुलीपासून ते धाकडमधील मोहक गुप्तहेरपर्यंत, मणिकर्णिकामधील देवीपासून चंद्रमुखीतील राक्षसापर्यंत, रज्जोमधील वेश्येपासून थलाईवीतील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. तसंच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या कामगारांचा अशाप्रकारे अपमान करणे थांबवले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे, असा पलटवार कंगनाने केला.

सुप्रिया श्रीनेत यांचं स्पष्टीकरण

माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम खात्याचा गैरवापर करून एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मला ओळखण्याऱ्यांना माहित असेल की मी स्त्रियांबाबत असं कधीच करणार नाही. माझ्या नावाचा गैरवापर करणारे पॅरोडी खातेही सुरू असून यातून संपूर्णपणे गैरप्रकार सुरू आहे. या खात्याची तक्रार केली आहे.

दरम्यान,हा फोटो कोणी पोस्ट केला? याची चौकशी सुरू असल्याचंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं आहे. परंतु, या फोटोवरून आता भाजपा आणि काँग्रेस यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे.