लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले. आता मतदानासाठी निवडणुकीचा तिसरा टप्पाही जवळ आला आहे. मात्र, महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच काही सुटला नाही. या जागेवर शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रत्येक निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी राज्यातील तीन प्रमुख पक्ष महायुतीमध्ये एकत्र असल्यामुळे या मतदारसंघाला महत्त्व आलं आहे.

नाशिकचा उमेदवार कोण? यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा, बैठका झाल्या. पण अद्याप उमेदवार ठरला नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत होते. मात्र, त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर आता नाशिक मतदारसंघात अचानक ट्वीस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा शांतीगिरी महाराज यांनी केला असला तरी पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, अशी माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

छगन भुजबळ काय म्हणाले?

“शांतीगिरी महाराजांबाबत मला कल्पना नाही. शांतीगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना उभं राहायचं त्यामुळे ते भेट घेणार. अर्ज दाखल करायचा म्हटल्यावर ते काय बोलणार मदत करा वैगेरे. पण आता आपण त्यांना काय सांगणार. आम्ही फॉर्म भरतोय सहकार्य करा, असे सर्वच म्हणत आहेत. नाशिकचा तिढा अजूनही सुटलेला नाही, यावर भुजबळ म्हणाले, मला याबात काहीही माहिती नाही. हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून सोडवतील. ते नाशिकच्या जागेवर ज्याचं नाव उमेदवारीसाठी जाहीर करतील, त्याचा प्रचार आम्ही सर्वजण करणार आहोत. कोणी विरोधी असला तरी निवडणुकीच्या काळात भेटत असतात. प्रत्येकाचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.