New Cabinet in Karnataka : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, आजच आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले आहे.

जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बी झेड जमीर अहमद खान यांनी सिद्धरामय्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळण्यात येणार असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली होती. त्यामुळे त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा >> सिद्धरामय्यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी (१९ मे) दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले.

हेही वाचा >> “कर्नाटकातील नव्या सरकारला शुभेच्छा, पण मराठी बांधवांना…”, सीमावादावरून आदित्य ठाकरेंचे काँग्रेसला साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिपदाचं जातीय समिकरण?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. खर्गे हे अनुसूचित जाती समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एम. बी. पाटील यांनीही आज शपथ घेतली असून ते लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. तर, जी. परमेश्वर यांनाही कॅबिनेटमध्ये मोठं खातं मिळण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचाही क्रमांक होता. परंतु, त्यांना मंत्रिपदावर समाधान मानावे लागले.