India Lok Sabha Election 2024 Phase 1 : जगातील सर्वात मोठी लोकशाही मानल्या जाणाऱ्या भारतात आजपासून सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम सुरू होत आहे. तब्बल सव्वा महिना सात टप्प्यात देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार आहे. आज (१९ एप्रिल) पहिल्या टप्प्यात देभातील १०२ आणि महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. खासकरून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, “तुम्ही दिवसभर मोबाइलवर बोटं फिरवत असतात. पण आज पाच मिनिटं काढून त्याच बोटाचा वापर मतदान यंत्रावर करा.”. पहिल्या टप्प्यात आज १६.८६ कोटी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना राजीव कुमार म्हमाले की, आम्ही दोन वर्षांपूर्वीच निवडणुकीच्या तयारीला लागलो होतो. मतदान केंद्राची यादी तयार करणे, तिथे पोहोचण्याचा रस्ता आणि त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करणे, मतदान केंद्रावर इतर पूरक व्यवस्था उभारणे, अशा प्रकारची सर्व सुविधा उभारण्यासाठी दोन वर्षांपासून सराव सुरू आहे.

Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : देशभर मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून खास आवाहन

तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय प्रयत्न झाले, याबाबतही राजीव कुमार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही महाविद्यालयांमध्ये जाऊन अनेक कार्यक्रम घेतले. तसेच लोकजागृती करण्यासाठीही अनेक उपक्रम हाती घेतले. आजचे तरूण मोबाइल फोनवर दिवसभर बोटं फिरवत असतात. त्या तरुणांनी आज फक्त पाच मिनिटं काढून मतदान यंत्राचे बटण दाबावे. मला आशा आहे की, यावेळी मोठ्या संख्येने तरूण बाहेर पडतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील.

राजीव कुमार पुढे म्हणाले की, यावेळी पहिल्यांदाच वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरीच मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. ८५ वयाहून अधिक वय असलेले वयोवृद्ध आणि ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधेक अपंगत्व असलेल्या मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. देभरात ८५ वयाहून अधिक वय असलेल्या ८१ लाख आणि ९० लाख दिव्यांग मतदारांनी घरातून मतदान करण्यासाठी देभरात नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पार पडत आहे. अरुणाचल प्रदेश (दोन मतदारसंघ), आसाम (पाच), बिहार (चार), छत्तीसगड (एक) मध्य प्रदेश (सहा) महाराष्ट्र (पाच) मणिपूर (दोन) मेघालय (दोन), मिझोराम (एक) नागालँड (एक) राजस्थान (१२), सिक्कीम (एक), तमिळनाडू (३९), त्रिपुरा (एक), उत्तर प्रदेश (आठ), उत्तराखंड (पाच) पश्चिम बंगाल (तीन), अंदमान आणि निकोबार (एक), जम्मू आणि काश्मीर (एक), लक्षद्विप (एक) आणि पुद्दुचेरी (एक) अशा १०२ मतदारसंघात निवडणूक होत आहे.