कर्नाटच्या हुबळीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या खून करण्यात आला. आरोपी आणि मृत तरूणी एकाच महाविद्यालयात शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज (वय २३) नामक आरोपीने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून त्याचे कृत्य महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नेहाचा पाठलाग करून फयाजने तिची हत्या केली आणि त्यांतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पकडले. पोलीस सध्या या घटनेमागचा हेतू तपासत आहेत.
नेहा हिरेमठ हुबळीच्या केएलई टेक्नोलॉजिकल विद्यापीठात एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. हत्या झाल्यानंतर नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देताना सांगितले की, फयाज आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. बीसीएच्या पहिल्या वर्षाच्या परिक्षेत नापास झाल्यामुळे मागच्या सहा महिन्यांपासून फयाज महाविद्यालयात येत नव्हता. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) तो स्वतःबरोबर धारधार शस्त्र घेऊन महाविद्यालयात आला आणि त्याने नेहा हिरेमठ हिच्यावर अनेक वार केले.
नेहा हिरेमठवर वार करून पळाल्यानंतर महाविद्यालयातील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी नेहाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून फयाज नेहाचा पिच्छा पुरवत होता.
दरम्यान या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. नेहाचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ताजी अपडेट
हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी या प्रकरणी ताजी माहिती देताना सांगितले की, हे प्रकरण गंभीर आहे. आम्ही एफआयआर दाखल केला असून आरोपीलाही तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
रेणुका सुकुमार पुढे म्हणाल्या की, आरोपीची चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील तथ्य समोर येईल. पोलीस त्यांचे काम चोखपणे करत आहेत. अभाविपंकडून आंदोलन सुरू आहे. याची आम्हाला कल्पना आहे. त्यांनाही आम्ही याबाबतची संपूर्ण माहिती दिली असून आंदोलकही आता मागे हटण्यास तयार झाले आहेत.