लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचं वेळापत्र जाहीर केलं. देशभरात १९ एप्रिलपासून सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लावला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्राची माहिती आणि भारतासारख्या मोठ्या देशात सार्वत्रिक निवडणूक घेतान येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. भारतातील भौगोलिक आव्हानं पेलत असताना कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूक यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ईव्हीएमबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; कोणत्या जिल्ह्यांत कधी होणार मतदान? जाणून घ्या

राजीव कुमार ईव्हीएमबाबत काय म्हणाले?

ईव्हीएमबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “या देशातील विविध न्यायालयांनी ४० वेळा ईव्हीएम विरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतली आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, यंत्र चोरी होतं, निकाल बदलू शकतो वैगरे वैगरे मुद्दे उपस्थित केले गेले. पण न्यायालयाने हे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. या यंत्राला व्हायरस लागू शकत नाही, अवैध मतदान होऊ शकत नाही. आता तर न्यायालयांनी ईव्हीएम विरोधातील याचिकांना दंड लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली न्यायालयाने नुकताच १० हजार रुपयांचा दंड लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने ५० हजारांचा दंड ठोठावला.”

राजीव कुमार पुढे म्हणाले, का पुन्हा पुन्हा ईव्हीएमवरून रणकंदन माजवले जात आहे. आम्ही सांगतो ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. जे निकाल एकदा दिसले, तेच पुन्हा पुन्हा दिसणार आहेत. आजकाल ईव्हीएमचे अनेक तज्ज्ञ लोक निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर ते डब्बे घेऊन बसतात आणि व्हिडिओद्वारे काहीबाही सांगत असतात. या तज्ज्ञ मंडळींनी कुठून पदवी मिळवली, हा संशोधनाचा विषय आहे. ईव्हीएमच्या ४० न्यायालयीन प्रकरणांवर आम्ही पुस्तक बनविले आहे. त्यावर १०० हून अधिक प्रश्नांची उत्तरे आम्ही दिले आहेत.

प्रचाराच्या वेळी मद्य, साड्या यांचं वाटप केल्यास काय होईल? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले..

ईव्हीएममुळे आज छोट्या छोट्या राजकीय पक्षांचीही दखल घेतली जात आहे. मतपत्रिकेच्या काळात छोट्या पक्षांना दाबलं जात होतं. सर्व ईव्हीएम मशीनचे तीन वेळा तपासणी केली जाते. ईव्हीएम यंत्र आल्यानंतर सत्तेत असणाऱ्या पक्षांना कितीवेळा सत्तेतून पायउतार व्हावं लागलं त्याचीही माहिती निवडणूक आयोगाच्या पुस्तकात दिली आहे, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव कुमार पुढे म्हणाले की, ईव्हीएमवर प्रश्न येणार, हे मला माहीत होतंच. त्यामुळं मी त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत. “अधुरी हसरतो का इल्जाम, हर बार हम पे लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो”, अशी एका ईव्हीएम मशीनची खंत त्यांनी बोलून दाखविली.