देशात आगामी काळात पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमख राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात असून, नवीन आघाड्या तयार करणे, अन्य पक्षांचे मंत्री, आमदारांना फोडण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये देखील जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं समोर आलं आहे.

कारण, मणिपूरमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेली भाजपा यंदा नागा पीपल्स फ्रंटसोबत युती करू शकते आणि यासाठी कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला दूर ठेवणार असल्याचं दिसत आहे. कारण, अद्याप भाजपा व एनपीपी यांच्यात जागा वाटपाबाबत कोणतीही विशेष चर्चा झालेली नाही.

शिवाय, नुकतेच नागा पीपल्स फ्रंट नेतृत्त्वाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती, परंतु ज्या पद्धतीने शक्यता वर्तवल्या जात आहेत, त्यावरून तरी आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होण्याची चिन्ह दिसत आहेत. कॉनराड संगमा यांच्या पक्षाशी युती करून भाजपा मेघालयमध्ये सत्तेत आहे, पण मणिपूरमध्ये असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा मणिपूरमधील सर्व ६० जागा लढवण्याची शक्यता आहे, २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोन टप्प्यात या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. सध्या, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए विधानसभेत ६० पैकी ३६ जागांसह बहुमतात आहे. यामध्ये भाजपाचे २४ आमदार आणि NPP आणि NDF चे प्रत्येकी चार, LJP मधील १ आणि तीन अपक्षांचा समावेश आहे.