Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule: लोकसभा निवडणूक नेमकी कधी असणार आहे? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं की दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते त्याप्रमाणेच घडणार आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष असणार आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा १६ मार्चला केली जाणार आहे. त्यामुळे १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार यात काहीही शंका नाही. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाईचे टप्पे जाहीर होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्याने तिसरी टर्मही आमचीच असेल असा दावा केला आहे. तर यावेळी आम्ही मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही असं इंडिया आघाडीने म्हटलं आहे. आता निवडणूक आयोग कुठे आणि कधी टप्पे जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
यावेळी लोकसभेच्या निवडणुका ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असे मानले जात आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे.
२०१९ ला १० मार्च रोजी घोषणा
गेल्या वेळी २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.