मी ही निवडणूक स्वत:साठी लढत नाही. मला पद नकोय, फक्त पंजाब पुन्हा सुजलाम, सुफलाम व्हावा ही इच्छा आहे. हा कोणाविरोधात वैयक्तिक लढा नाही. पंजाबमधील युवकांना योग्य मार्गावर आणायचे आहे. यंत्रणेत सक्रिय होऊन काम करणे माझ्यासाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले. अमृतसर (पूर्व) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणुकीसंबंधी आपले मतप्रदर्शन केले.
राज्यातील प्रत्येक पंजाबीला माझे आवाहन आहे की, या वेळी पंजाबसाठी मतदान करा, धर्माच्या स्थापनेसाठी मतदान करा. या वेळी पंजाब, पंजाबियत आणि पंजाबीसाठी जिंकायच आहे. जोडणाऱ्याला मान मिळतो तर तोडणाऱ्याचा अपमान होतो, असा टोलाही त्यांनी या वेळी भाजप व शिरोमणी अकाली दलाचे नाव न घेता लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मंगळवारी प्रथमच अमृतसरमध्ये आलेल्या सिद्धूंचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले होते. सिद्धूंनी अमृतरसर शहरातून रॅली काढली होती. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पंजाबच्या विकासासाठी व युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तसेच अकाली दलाचा भंडाफोड करण्यासाठी आपण काँग्रेसपक्षात आल्याचे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही लांबी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अकाली दलाचे नेते व विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत बादल यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला. या वेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली.

मराठीतील सर्व पंजाब बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu files nomination from amritsar east for assembly election
First published on: 18-01-2017 at 13:42 IST