लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (२६ एप्रिल) होणार आहे. तर ज्या ज्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात (७ मे) मतदान होणार आहे तिथल्या प्रचाराला आता जोर आला आहे. धाराशिव हा त्यापैकी एक मतदारसंघ असून या मतदारसंघातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी (२४ एप्रिल) सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती आणि तुळजापूरचे आमदार राणजगजीतसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

राणा जगजीतसिंह पाटील यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. मात्र १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पद्मसिंह पाटील हे शरद पवारांबरोबर गेले. त्यानंतर पाटील कुटुंब हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (संयुक्त) होतं. मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर राणा पटील धाराशिवमधून आमदार म्हणून निवडून आले. तर यंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला असून अजित पवार गटाने त्यांना धाराशिवमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

राणा पाटील हे २०१४ पासून विधानसभेवर आमदार म्हणून काम करत आहेत. तर २००५ ते २०१४ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राणा पाटलांना २००४ मध्येच ते आमदार नसूनही त्यांना राज्याचं कृषी, उद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्रिपद दिलं होतं. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. याच गोष्टीचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राणा पाटलांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा >> लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

धाराशिवच्या सभेत शरद पवार म्हणाले, आमदार नसतानाही आम्ही राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्री केलं. मला तेव्हा वाटलेलं की ते लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करतील. मात्र आज इथे आल्यावर त्यांचे एकंदरीत उद्योग पाहिले. विशेषतः तुळजापूर आणि धाराशिवमधील त्यांच्या उद्योगांबाबत ऐकलं आणि माझ्यासारख्या माणसालाही धक्का बसला. त्यामुळे मी धाराशिवमधील मतदारांना आवाहन करेन की या लोकसभा निवडणुकीत तुम्ही ओम राजेनिंबाळकर यांना मोठ्या मतांनी विजय करणं हे तुमचं, माझं आणि सर्वांचंच कर्तव्य आहे.