पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. ठाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला आहे. कुमार केतकर यांनी नरेंद्र मोदी फॅसिस्ट विचारांचे आहेत असाही आरोप केला आहे.

काय म्हणाले कुमार केतकर?

“लोकसभेची निवडणूक राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी नाही. तर ही निवडणूक राजन विचारे विरुद्ध फॅसिझम अशी आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्या देशाचं राज्य २०१४ पासून ताब्यात घेतलं आहे. त्याचे प्रतिनिधी म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत कारण छत्रपती शिवरायांनी जी सूरत लूट केली त्याचा वचपा हे दोघेजण काढत आहेत. या प्रवृत्तींचा पराभव करायचा असेल तर आपल्याला ठाण्यापासून त्याची सुरुवात करावी लागेल आणि राजन विचारेंना प्रचंड मतांनी निवडून द्यावं लागेल.” असं कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

दोन जागांवरुन २८२ जागा कशा झाल्या?

“मागच्या ७० वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने काहीच कामं केली नाहीत असा प्रचार भाजपाचे लोक करत आहेत. कंगना रणौत तर असं म्हणाली की भारताला स्वातंत्र्यच २०१४ मध्ये मिळालं. तुम्ही सगळ्यांनी २०१४ मध्येही मतदान केलं, २००९ मध्येही मतदान केलं आणि २०१९ मध्येही मतदान केलं. २००९ च्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या की त्यांना आडवाणींना काढून टाकावं लागलं आणि मार्गदर्शक मंडळात टाकावं लागलं. २००९ ते २०१४ या कालावधीत नरेंद्र मोदींना त्यांचा जम बसवण्यास सुरुवात केली. एक काळ असा होता की भाजपाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्या २०१४ मध्ये २८२ झाल्या होत्या. दोन जागांच्या २८२ जागा झाल्या कारण मतदारांनी त्यांना निवडून दिलं. २०१२ ते २०१४ या कालावधीत मोदींनी ज्या वल्गना केल्या त्याला मतदार भुलले. त्यामुळे त्यांना इतक्या जागा मिळाल्या. तो धोका आत्ताही लक्षात घेतला पाहिजे. या कालावधीत नरेंद्र मोदी काहीही करु शकतात. तुम्ही दिलेलं मत वळवून कमळाकडे जाऊ शकतं अशी रचना त्यांनी करुन ठेवली आहे.” असाही आरोप कुमार केतकर यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१२ पासूनच मोदींना शिवसेना फोडायची होती

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव पुढे येण्याधी लालकृष्ण आडवाणी हे नावच चर्चेत होतं. मात्र तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी हे सांगितलं की लालकृष्ण आडवाणी नसतील तर आमचा पाठिंबा सुषमा स्वराज यांना आहे. ही भूमिका घेतल्याने नरेंद्र मोदींना हे लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे काही आपल्या बाजूने नाहीत. मग नरेंद्र मोदींनी हे ठरवलं की आपण ठाकरे कुटुंबाशीच वैर धरायचं. ठाकरेंना धडा शिकवायचा हे ठरवलं होतं. २०१२ मध्ये त्यांनी धडा शिकवण्यास सुरुवात केली. २०१२ पासूनच त्यांना शिवसेना फोडायची होती. २०१९ मध्ये मोदींनी ते करुन दाखवलं. शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा निर्धार २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच झाला होता. हे सगळं आपल्याला म्हणजे सामान्य जनतेला समजायला उशीर झाला. २०१४ मध्ये शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मतदारांनी वेगळं मतदान केलं असंही कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.