तेलंगणातील भाजपाचे लोकप्रिय नेते आणि प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले टी. राजा सिंह हे तेलंगणाच्या गोशामहल या मतदारसंघात २१ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. राजा सिंह हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. प्रेषितांबद्दलच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांना तेलंगणा भाजपामधून निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, वर्षभर पक्षापासून लांब ठेवल्यानंतर भाजपाने दोन महिन्यांपूर्वी टी. राजा सिंह यांचं पुनर्वसन केलं. भाजपाने त्यांना गोशामहल या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली. दरम्यान, राजा सिंह यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ८०,१८२ मतांसह ते विजयी झाले आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राजा सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना पक्षातून निलंबित केलं. राजा सिंह यांचं वक्तव्य पक्षाच्या घटनेविरोधात असल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली होती.

हैदराबाद येथे स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारूकी याचा कार्यक्रम होणार होता. त्याआधी राजा सिंह यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडीओ प्रसारित करून, फारूकीवर टीका केली होती. आपण पोस्ट केलेला व्हिडीओ मनोरंजनासाठी असून, त्यात कुठेही प्रेषितांचा उल्लेख केला नव्हता, अशी भूमिका राजा सिंह यांनी घेतली. हैदराबाद येथे मुस्लीम संघटनांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. राजा सिंह यांनी या नोटिशीला तुरुंगातूनच उत्तर दिले. फारुकीने हिंदू देवतांविरोधात वक्तव्य केल्यामुळे काही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला होता. याचा उल्लेखही सिंह यांनी त्यांच्या उत्तरात केला होता. तब्बल तीन महिने तुरुंगात काढल्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजा सिंह यांना अटी-शर्तींवर जामीन दिला. द्वेषपूर्ण वक्तव्यांप्रकरणी तेलंगणासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातही त्यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत टी. राजा सिंह?

टी. राजा सिंह (४६) तेलंगणातील गोशामहल या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकतीच त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ते राजा भैया किंवा टायगर भैया या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा मतदारसंघ आणि हैदराबाद परिसरात ते लोकप्रिय आहेत. कट्टर गोरक्षक ही त्यांची ओळख आहे. बजरंग दलचे सदस्य असलेले सिंह २००९ साली राजकारणात उतरले. मंगलहाट या ठिकाणाहून तेलुगू देसम पक्षाचे नगरसेवक या पदापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत गोशामहल या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवून काँग्रेसकडून हा मतदारसंघ खेचून घेतला. गेल्या १० वर्षांपासून हा मतदारसंघ राजा सिंह यांच्याकडे आहे.