लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या टप्प्याची. वेगवेगळे दावे काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलतील असाही आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह भाजपातले सगळेच नेते भाजपा आणि एनडीएने कसा विकास केला काय काय कामं केली ते सांगत आहेत. अशातच भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हटलं आहे अमित शाह यांनी?

“आमच्या समोर तुल्यबळ म्हणावा असा किंवा आमच्या तोलामोलाचा विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. आमच्या पक्षाने त्याचं तपशीलवार विश्लेषण केलं आहे. दोन टप्प्यांमध्येच आम्ही १०० हून जास्त जागांवर जिंकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे ४०० पारचं लक्ष्य आम्हाला फार मोठं वाटत नाही.” असा आत्मविश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी मोदींची कारकीर्द

“गाव, शहर, जंगल, वाळवंत, समुद्र किनारे किंवा शहरातले इतर भाग. पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप मोठी कामं होत आहेत. भारतीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये खर्च करणं ही बाब सामान्य नाही. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांमध्ये जी कामं केली आहेत त्यामुळे देश पुढे जातो आहे. सुवर्णाक्षरांनी लिहावीत अशी ही दहा वर्षे आहेत.” असंही अमित शाह म्हणाले. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या दोन टप्प्यांविषयी काय वाटतं आणि लोकसभा निवडणूक कशी सुरु आहे याबाबत अमित शाह यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

४०० पारचं लक्ष्य सहज पार करणार

“भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर आहे. ४ जूनच्या दिवशी म्हणजेच निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल की दुपारी १२.३० च्या आधी एनडीए खासदार संख्या ४०० पार करणार. ४०० पारचं लक्ष्य आम्हाला मोठं वाटत नाही. ते सहज पार होईल.” असा दावा अमित शाह यांनी या मुलाखतीत केला आहे.

हे पण वाचा- अमित शाहांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंटवर कारवाई; खात्यावर Account Withheld चा संदेश!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे

भारतीयांचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास निर्माण करणं ही कायमच नेतृत्वाची जबाबदारी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात यशस्वी झाले आहेत. १३० कोटी भारतीयांमध्ये हा आत्मविश्वास दुणावला आहे की आपण जगात पहिल्या क्रमांकावर येऊ शकते. रामजन्मभूमी, नवीन आर्थिक धोरण, कलम ३७० रद्द करणं, तिहेरी तलाक संपवणं, फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे शक्य होणार आहे. तसंच करोना सारख्या महामारीशी आपल्या देशाने खूप उत्तम प्रकारे सामना केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झालं ही जनभावना आहे. असंही अमित शाह म्हणाले आहेत.