उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अजित पवारांसारखा भ्रष्टाचार करायला खातं (मंत्रीपद) दिलं नव्हतं, असं वक्तव्य जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं आहे. तसेच फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या चेलेचपाट्यांना सांभाळावं असा सल्लादेखील उन्मेश पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या चेलेचपाट्यांमुळे खानदेशाचं मोठं नुकसान होत आहे. हे वक्तव्य करत असताना पाटील यांचा रोख मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होता, असं बोललं जात आहे. पाटील यांनी गिरीश महाजन यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे. तसेच, मला तुरुंगात टाकून जर प्रश्न सुटत असतील तर मी आनंदाने तुरुंगात जायला तयार आहे, असंही पाटील म्हणाले.

महायुतीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथे मशाल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, आमच्या या मशाल रॅलीच्या माध्यमातून खानदेशात आता क्रांती सुरू झाली आहे.

दरम्यान उन्मेश पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरही उत्तर दिलं. “आम्ही उन्मेश पाटील यांचा तिकीट कापून त्यांना वाचवलं”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केलं होतं, यावर उन्मेश पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, मला असं वाटतं की फडणवीस यांनी अजित पवारांसारखं मला भ्रष्टाचार करायला एखादं खातं दिलं नव्हतं, किंवा फडणवीसांनी मला वाचवायला मी काही अशोक चव्हाणांसारखा मुख्यमंत्री देखील नव्हतो. त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळच्या चेलेचपाट्यांना सांभाळावं, तपासावं आणि खात्री करून घ्यावी. तसेच मला तुरुंगात टाकून प्रश्न सुटत असतील तर मला याचा आनंदच आहे.

उन्मेश पाटील यांनी यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देखील इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, गिरीश महाजन यांनी जे काही चालवलं आहे ते आता बंद करायला हवं. खानदेशातील लोक आता त्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. महाजन यांनी त्यांचं राजकारण बदलावं. लोक विकासाची अपेक्षा करत आहेत, घाणेरड्या राजकारणाची नव्हे.

हे ही वाचा >> “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना आमचं सरकार…”, काँग्रेस उमेदवाराच्या घोषणेने मोठा वाद

उन्मेश पाटलांकडून जळगावात करण पवार यांचा प्रचार

जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या महिन्यात ३ एप्रिल अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पाटील गेल्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर जळगावातून लोकसभा निवडणूक जिंकले होते. मात्र भाजपाने यंदा त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पाटील आता जळगावात करण पवार यांचा प्रचार करत आहेत. तसेच आगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत.