माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी गुरुवारी एका प्रचारसभेत केलेल्या घोषणेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीसह एनडीएतील मित्रपक्ष भूरिया आणि काँग्रेसवर टीका करू लागले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात ‘महालक्ष्मी योजने’ची घोषणा केली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काँग्रेसने या योजनेची घोषणा केली आहे. यांतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस, बस प्रवासासाठी सबसिडी दिली जाणार आहे. या योजनेचा उल्लेख करत कांतीलाल भूरिया यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भूरिया म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने न्याय पत्रात (निवडणुकीचा जाहीरनामा) महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. याअंतर्गत आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातील महिलांना आम्ही दर वर्षी १ लाख रुपये देणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या दोन बायका (पत्नी) असतील त्यांना २ लाख रुपये मिळतील. कांतीलाल भूरिया यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर आणि भूरिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपाने कांतीलाल भूरिया यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

भूरिया हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील सैलाना येथील प्रचारसभेत म्हटलं आहे की, आमचा जाहिरनामा महिलांना दर वर्षी १ लाख रुपये देण्याचं वचन देतो. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. तसेच ज्या वक्तीच्या दोन पत्नी असतील त्यांना या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये दिले जातील.

काँग्रेसे प्रदेशाध्यक्षांकडूनही समर्थन

भूरिया यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा मंचावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारीदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील भूरिया यांच्या घोषणेचं समर्थन केलं. पटवारी म्हणाले, भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे. महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख महिलांना दर महिन्याला ८,५०० रुपये अर्थसहाय्य केलं जाईल.

हे ही वाचा >> लोकसभा निवडणूक जिहाद विरुद्ध विकास! गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

दरम्यान, या प्रचारसभेत भूरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भूरिया म्हणाले, पंतप्रधानांनी देशातील आदिवासी लोकांचा अपमान केला आहे. एका भाजपा नेत्यांने आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर, अंगावर लघूशंका केल्यानंतर भाजपावर टीका झाली. मात्र मोदी त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यांनी त्यांच्या नेत्याला पाठिशी घातलं.