उत्तर प्रदेश-३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश सरलष्कर, गोरखपूर

पाच वर्षे सत्ता भोगून भाजपला सोडले, दहा वर्षांत तीन पक्ष बदलले, स्वार्थी नेत्याचे नावही घेऊ नका, पक्षाशी काडीमोड घेणाऱ्यांना पराभूत करून धडा शिकवा, असे आवाहन वक्त्यामागून वक्ते प्रचारसभेत मतदारांना करत होते. फाजिलनगरमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित केली होती, योगी येण्याआधी स्थानिक नेत्यांची आक्रमक भाषणे होत होती. नाव न घेतलेले गद्दार म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य. भाजपच्या तगडय़ा आव्हानामुळे मौर्यासाठी हा मतदारसंघ तितका ‘सुरक्षित’ राहिलेला नाही.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ब्राह्मण उमेदवार अचानक बदलून समाजवादी पक्षातून आलेल्या इलियास अन्सारी यांना तिकीट दिले आहे. फाजिलनगर मतदारसंघात १५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत. अन्सारींमुळे ‘सप’ आणि ‘बसप’मध्ये संघर्षांचा देखावा निर्माण झाला असला तरी खरी लढाई ‘सप’ विरुद्ध ‘भाजप’ अशी रंगण्याची शक्यता दिसू लागली आहे.

भाजपने कुशवाहा समाजातील सुरेंद्रसिंह कुशवाहा यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाकडून लढणारे स्वामी प्रसाद मौर्य हेही कुशवाहाच. या मतदारसंघात १३ टक्के कुशवाहा मतदार आहेत आणि ९ टक्के सैंथवार मतदार आहेत. योगींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन गाजावाजा करत ‘सप’मध्ये गेलेल्या स्वामींसाठी कुशवाहा, सैंथवार, मुस्लीम आणि यादव (६ टक्के) असे सुमारे ४३ टक्के मतांचे एकत्रित समीकरण विजयाची खात्री देणारे होते. पण, इथे १७ टक्के दलित आहेत, ते ‘बसप’कडे वळतील. १० टक्के ब्राह्मण भाजपचा पर्याय निवडतील. फाजिलनगर मतदारसंघ कुशीनगर जिल्ह्यात असून काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेलेले नेते आरपीएन सिंह हे मूळ कुशीनगरचे. शिवाय, ते  सैंथवार.  कुशवाहा आणि  सैंथवार या दोन्ही समाजांची मते भाजप आणि ‘सप’ यांच्यामध्ये विभागण्याची शक्यता आहे. या गुंत्यामुळे स्वामी प्रसाद मौर्याची लढाई तुलनेत अवघड झाली आहे.

फाजिलनगरपासून पाच-सहा किमी अंतरावरील पटेहरवा गावात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मुस्लीम वस्ती आहे. साठी उलटून गेलेले पानपट्टीवाले महम्मद युसूफ खान यांच्या म्हणण्यानुसार, अन्सारी ‘सप’मधून ‘बसप’मध्ये कशाला गेले? सत्तेसाठी थोडी वाट पाहायची होती, आता ‘सप’ची सत्ता येईल, अन्सारींचे भले झाले असते!..

महामार्गाच्या पलीकडच्या बाजूला अलीउल्ला खान यांचे किराणा दुकान आहे. गावकऱ्यांचा गप्पांचा फड या दुकानात रंगतो. दुकानदार खान यांच्या म्हणण्यानुसार, अन्सारींच्या गावातील मुस्लीम मते त्यांना मिळतील, पण अख्ख्या फाजिलनगर मतदारसंघात ९० हजार मुस्लीम मते आहेत, ती सगळी अन्सारींना थोडीच जाणार? अन्सारींना मत म्हणजे भाजपला मत. मग, थेट आम्ही भाजपला मत देऊ. मायावतींचा ‘बसप’ कशाला पाहिजे?

मुस्लिमांचे मत सपला!

स्वामींच्या यशाची चावी मुस्लिमांकडे असून त्यांनी अन्सारी यांना कौल दिला, तर फाजिलनगरात भाजप बाजी मारेल आणि स्वामींना धडा शिकवण्याची योगींची मनीषा पूर्ण होईल. पण इथे मुस्लिमांनी ‘सप’ची सायकल घट्ट धरली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up assembly elections 2022 yogi adityanath target swami prasad maurya in rally zws
First published on: 28-02-2022 at 00:36 IST