PM Modi in Rajasthan: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराचा जोर पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता येत्या २६ एप्रिल रोजी पुढच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही वेगवेगळ्या प्रचारसभांमधून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, रविवारी राजस्थानमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदींनी केलेल्या विधानावरून आता चर्चा सुरू झाली आहे. “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असं विधान त्यांनी केलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

राजस्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी मोदींची प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला.

“काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते मनमोहन सिंग?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार २००६ मध्ये मनमोहन सिंग यांनी यासंदर्भातलं विधान केलं होतं. “देशाच्या विकासाची फळं एकसमान पद्धतीने अल्पसंख्यकांना, विशेषत: मुस्लिमांनाही मिळावीत यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या संसाधनांवर त्यांचा पहिला अधिकार असायला हवा”, असं मनमोहन सिंग म्हणाले होते.

“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला…

काँग्रेस लोकांमध्ये भीती पसरवतेय – नरेंद्र मोदी

दरम्यान, काँग्रेसवर टीका करताना मोदींनी राज्यघटनेचाही उल्लेख केला. “कधीकधी ते दलित आणि आदिवासी जनतेमध्ये भीती पसरवतात. सध्या काँग्रेस राज्यघटना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भीती पसरवत आहे. त्यांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांचं हे खोटं अजिबात कामी येणार नाही. कारण दलितांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या विधानावर विरोधकांची टीका

दरम्यान, मोदींच्या मुस्लिमांबाबतच्या विधानावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. “देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना ‘घुसखोर’ या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसनं कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून , राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही. जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही”, अशी पोस्ट शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.