Assembly Elections 2022 Voting Updates: विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (१४ फेब्रुवारी) गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत. गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती. मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.