संयुक्त जनता दलाने (जेडीयू) बुधवारी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. राज्यातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जेडीयूतर्फे स्पष्ट करण्यात आले. पाटणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नितीश कुमार उत्तर प्रदेशात अखिलेश यादव किंवा अन्य कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून यामध्ये उत्तर प्रदेशचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर ११ मार्चला मतमोजणी पार पडेल. या पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षात सुरू झालेल्या ‘यादवी’ युद्धात अखिलेश विजयी ठरले आहेत. त्यानंतर आता समाजवादी पक्षाने काँग्रेसच्या साथीने निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जेडीयूने बुधवारी निधर्मीवादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) सल्ल्यामुळे जेडीयूने माघारीचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमध्ये लढल्यास संभ्रम निर्माण होईल. २०१२ मध्ये जेडीयूने उत्तर प्रदेशमध्ये ४०३ पैकी २१९ जागा लढवल्या होत्या. मात्र, यापैकी एकही जागा जेडीयूला जिंकता आली नव्हती. मात्र, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा उत्तर प्रदेशची निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तारीख तोंडावर आली तरी, सत्ताधारी समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद अद्यापही शमलेले दिसत नाही. पक्षात अखिलेश यादव यांचेच वर्चस्व आहे, हेच आता स्पष्ट होत आहे. पक्षाने शिवपाल यादव यांना उमेदवारी दिली असली तरी, निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील दुफळी अजून कायम आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. समाजवादी पक्षाने मंगळवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांचे नाव नसल्याचे दिसते. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी सोपवली. त्यात मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांच्यासह इतर ३८ नेत्यांची नावे आहेत. मात्र, त्यात मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांच्या नावाचा समावेश नाही. रामगोपाल यादव यांनी दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत किरोणमय नंदा, आझम खान, रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, जया बच्चन, राजेंद्र चौधरी, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबु आझमी यांच्यासह ३८ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पक्षाने शिवपाल यादव यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. इटावाह जिल्ह्यातील जसवंत नगर मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे शिवपाल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावेळीही मुलायमसिंह आणि शिवपाल यादव हे अनुपस्थित होते. वाहतूक कोंडीमुळे जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे कारण पक्षाकडून देण्यात आले होते. दरम्यान, समाजवादी पक्ष दोन गटांत विभागले गेले आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. अखिलेश यादव यांना पक्षाच्या सर्व आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हाची निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलेली लढाई अखिलेश यादव यांनी जिंकली होती. निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्हीही अखिलेश यादव यांना दिले होते.