उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जेव्हा आपले वडील मुलायमसिंह यादव आणि काका शिवपाल यादव यांचा राजकीय धोबीपछाड केला. तेव्हापासून त्यांची राजकीय उंची पूर्वीपेक्षा वाढली आहे. आता ते समाजवादी पक्ष आणि यूपी सरकारचे निर्विवाद नेता बनले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार अखिलेश हे मुख्यमंत्री निवास, ५ कालिदास मार्गावर काही खास सल्लागार आणि विश्वासू लोकांबरोबर नेहमी चर्चा करत असतात. अखिलेश यांच्या जवळचे सल्लागार कोण आहेत हे जाणून घेऊयात.
१. व्यंकट चंगावल्ली, उत्तर प्रदेश सरकारचे गृह आणि आरोग्य सल्लागार
व्यंकट यांनी एनआयटी वारंगल येथून बीटेक आणि आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए पूर्ण केलेले आहे. व्यंकट यांनी हैदराबाद येथील इमरजन्सी मॅनेजमेंट आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (इएमआरआय) कार्यरत असताना २००५ साली आपातकालीन अॅम्ब्युलन्स ‘डायल १०८’ ही सेवा सुरू केली होती. बुलंद शहरात आई आणि मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर अखिलेश सरकारने व्यंकट यांच्या मार्गदर्शनाखालीच आपातकालीन पोलीस मदतीसाठी ‘डायल १००’ ही सेवा सुरू केली होती.
व्यंकट हे मुळचे हैदराबादचे आहत. वर्ष २०१४ साली ते अखिलेश यांना भेटल्याचे व्यंकट यांनी रेडिफ डॉट कॉमशी बोलताना सांगितले होते. व्यंकट हे एम. करूणानिधी आणि बी. एस. येडियुरप्पा यांचेही सल्लागार होते. अखिलेश हे प्रशासन, सामाजिक कार्यक्रम आणि आर्थिक धोरणांबाबत त्यांचा सल्ला घेतात.
२. आमोद कुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव
आमोद कुमार यांनी कानपूर आयआयटीतून बीटेक आणि जपानमधून उच्च शिक्षण घेतले आहे. २००४ मध्ये मुलायमसिंह यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून आमोद समाजवादी पक्षाच्या निकटच्या वर्तुळातील असल्याचे मानले जाते. राज्य सरकारच्या इ-गव्हर्नंसशी निगडीत योजनांचा त्यांना सूत्रधार मानले जाते. नुकतीच त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील समाजकल्याणाशी निगडीत योजनांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
३. शिव नाडर, हिंदुस्तान कॉम्प्युटरचे संस्थापक
माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील शिव नाडर यांच्या कार्याचा अखिलेश यांच्यावर मोठा प्रभाव पडल्याचे सांगण्यात येते. लखनऊ येथे १०० एकर परिसरात आयटी सिटी बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अखिलेश यांची आयटी हब योजना ही लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे आणि लखनऊ मेट्रो रेल्वे योजनेप्रमाणेच लोकप्रिय आहे.
४. अभिषेक मिश्रा, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
उत्तर प्रदेशचे माजी नोकरशाह अखिलेश मिश्रा यांचे चिंरजीव असलेले अभिषेक हे २०१२ पासून अखिलेश यांच्याबरोबर आहेत. राज्यात गुंतवणूक आणण्याबाबत अखिलेश हे अभिषेक यांच्यावर खूप विसंबून असल्याचे बोलले जाते. मुलायम-शिवपाल यादव यांच्याशी राजकीय वादाप्रसंगी त्यांनी अभिषेक यांचा सल्ला मानला होता.
५. किरणमय नंदा, राज्यसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष
मुलायमसिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे किरणमय नंदा यांनी यादव कुटुंबातील अंतर्गत संघर्षाप्रसंगी अखिलेश यांची साथ दिली. नंदा यांनी पश्चिम बंगाल समाजवादी पक्ष स्थापन केला होता. डाव्या आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी मत्स्य पालन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. १९९६ मध्ये त्यांचा पक्ष समाजवादी पक्षात विलिन झाला होता.
६. राजेंद्र चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते
वाहिन्यांवर जेव्हाही अखिलेश यादव दिसतात. बहुतांश वेळी त्यांच्यामागे राजेंद्र चौधरी असतातच. मुलायमसिंह यांचे निकटवर्तीय राहिलेले चौधरी हे अखिलेश यांच्या टीममधील महत्वाचे सदस्य मानले जातात.
७. रामगोपाल यादव, राज्यसभा सदस्य
समाजवादी पक्षाच्या परिवारातील वादात ज्याप्रमाणे मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर शिवपाल यादव होते. त्याचप्रमाणे अखिलेश यांच्याबरोबर रामगोपाल यादव असत. अखिलेश यांना भडकवण्याचे काम रामगोपाल यांनी केल्याचा आरोप मुलायमसिंह वारंवार करताना दिसतात. भाजपच्या इशाऱ्यावर ते चालतात, असा आरोप शिवपाल यादव यांनी केला आहे. तर रामगोपाल यांनी शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय अमरसिंह हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप केला आहे.