सर्व पाच राज्यातील मतदान संपल्यानंतर बुधवारी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. सर्व एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष बनणार असल्याचे दिसून आले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे विरोधी पक्षांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. निकाल लागण्यापूर्वी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. यूपीत सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या एका मंत्र्याने काँग्रेसबरोबर केलेली आघाडीच समाजवादी पक्षाच्या खराब कामगिरीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अखिलेश यादव सरकारमध्ये कुटुंब कल्याण मंत्री असलेले रविदास महरोत्रा हे लखनऊ मध्य मधून उभे आहेत. येथे पहिल्यांदा काँग्रेसने मरूफ खान यांना उमेदवारी दिली होती. आघाडी झाल्यानंतर काँग्रेसने मरूफ यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्याचा दावा केला होता. परंतु, खान यांनी माघार न घेता निवडणूक लढवली. त्यामुळे नाराज असलेल्या महरोत्रा यांनी काँग्रेसला दुषणे देण्यास सुरूवात केली आहे.

समाजवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस उमेदवार उभे राहिल्याने सपचे नुकसान झाल्याचा आरोप करत भाजपला ही निवडणूक अत्यंत सोपी गेल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे उमेदवार मरूफ यांनीही एकाच जागेवर आघाडीचे उमेदवार उभे राहिल्याने त्याचा फायदा भाजप उमेदवार ब्रजेश पाठक यांना मिळाल्याचे म्हटले. पाठक हे निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाचा त्याग करत भाजपमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसबरोबर आघाडी केल्यानेच समाजवादी पक्षाला नुकसान सोसावे लागले. उलट काँग्रेसला याचा मोठा फायदा झाला असल्याचे माझे वैयक्तिक मत असल्याचेही महरोत्रा यांनी सांगितले.
जर आघाडी झाली नसती तर समाजवादी पक्ष एकट्याने सरकार बनवण्यास सक्षम असली असती. कारण अखिलेश सरकारला आणखी एक संधी देण्याचे मन लोकांनी बनवले होते, असे महरोत्रा यांनी म्हटले. महरोत्रा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे प्रवक्ते सत्यदेव त्रिपाठी यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मरूफ खान यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने ते नाराज असल्याचे ते म्हणाले.