विधानसभा निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या या धामधुमीतही निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात सुरू झालेला कलह अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. प्रचार सभांमधूनही आता एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. विरोधकांवर हल्ला करताना समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते परस्परांविरोधातही वक्तव्ये करत आहेत. यामध्ये शिवपाल यादव यांनी नवे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे. आपल्या अंतर्गत वादाबद्दल बोलताना ते म्हणाले, जर माझ्याबरोबर चांगली वर्तणूक असेल आणि अपमान होणार असेल तर मी बरोबरच असेन. परंतु जर मला सन्मान मिळाला नाही तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट करत आमच्या घरातील वाद सोडवण्याची जबाबदारी ही नेताजी (मुलायमसिंह यादव) आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची असल्याचे म्हटले.
Kuch bade logon ke ishare par DM SSP ne shant purn polling (Jaswantnagar) mei lathi-charge karwaya: Shivpal Yadav pic.twitter.com/cl4RitgX4A
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 22, 2017
विशेष म्हणजे शिवपाल यादव यांनी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर नवा पक्ष काढणार असल्याचे म्हटले होते. निवडणुकीचे तीन टप्पे संपले आहेत. उर्वरित टप्प्यांबाबत शिवपाल यादव म्हणाले, मी लखनौमध्ये जाऊन भाजपला कसे पराजित करायचे याची रणनिती ठरवणार असल्याचे म्हटले.
शिवपाल यादव निवडणूक लढवत असलेलया जसवंतनगर येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याबाबत ते म्हणाले, हे सर्व दारू माफिया आणि पक्षातीलच काही लोकांच्या इशाऱ्यावर हे कृत्य करण्यात आले आहे. तपासानंतर सत्य समोर येईल, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नेताजींना सन्मान मिळावा, अशी माझी इच्छा होती. मी नेताजींबरोबर आहे. त्यांचा जो आदेश असेल तो मला मान्य आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले. काँग्रेसच्या प्रचारासाठी मुलायमसिंह यादव यांनी सांगितले तरच मी जाईल अन्यथा नाही, असे त्यांनी सांगितले.