पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे प्रचार सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा एक नेता पोरकटपणा करत आहे. पक्षातील नेतेच त्याचे काही ऐकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला. यावेळी मोदींनी अखिलेश यादव सरकारवरही टीकास्त्र सोडले. निरपराध लोकांना तुरुंगात टाकून अखिलेश यादव यांनी कायद्याचा दुरुपयोग केला, असा आरोप मोदी यांनी केला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये रंगतदार ‘सामना’ सुरू आहे. काँग्रेस आणि सपच्या जाहीर सभांमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिजनौरमधील प्रचार सभेतून राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. सुरुवातीलाच त्यांनी समाजवादी पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. अखिलेश यादव यांनी भाजपविरोधात पोलिसांना कामाला लावले, असा गंभीर आरोप केला. ११ मार्चला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. हा केवळ निकाल नसेल, तर समाजवादी पक्षाचे ‘काळेबेरे’ बाहेर काढणारा निकाल असेल, असेही मोदी म्हणाले. अखिलेश करत असलेले पाप फार काळ लपवू शकत नाहीत. अखिलेश यादव यांनी कायद्याचा दुरुपयोग केला आहे. निरपराध लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम केले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजपचे तुफान धडकले आहे. भाजपच्या तुफानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एरवी तू-तू, मैं-मैं करणारे एकत्र आले आहेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. कोणत्याही राजकीय नेत्याची खिल्ली उडवली जात नाही, तितकी काँग्रेसच्या एका नेत्याची खिल्ली उडवणारे जोक्स सोशल मीडियावर केले जात आहेत, असा टोला मोदी यांनी राहुल यांना लगावला. काँग्रेसमधील वरिष्ठ नेते त्या नेत्याचे काहीही ऐकत नाहीत. त्या नेत्यालाच अखिलेश यांनी सोबत घेतले आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यानंतर अखिलेश यांच्या समजूतदारपणावरच शंका यायला लागली. राज्यातील महिला दिवसाढवळ्याही बाहेर पडू शकत नाहीत. येथील महिला असुरक्षित आहेत. ज्यांचे विचारच तसे आहेत, ते महिलांची सुरक्षा काय करणार, असा सवाल करत त्यांनी मुलायम सिंह यांच्यावरही ‘लक्ष्यभेद’ केला.