उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या अनेक ‘आयडियाच्या कल्पना’ लढवल्या जात आहेत. काँग्रेस आणि समाजवादी समर्थकही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा जोरदार प्रचार करत आहेत. भाजप आणि मोदी समर्थकांनीही प्रचाराची नवी कल्पना लढवली आहे. सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘मोदी जिलेबी’ची जोरदार चर्चा आहे. लखनऊमध्ये भाजपचा समर्थक असलेला एका मिठाईच्या दुकानाचा मालक ‘मोदी जिलेबी’ आणि भाजपचे चिन्ह असलेल्या ‘कमळा’च्या प्रतिकृतीच्या जिलेबी बनवून भाजपचा प्रचार करत आहे.
A Sweet shop in Lucknow campaigns for BJP by making 'Modi jalebis' and 'Kamal jalebis' #uppolls2017 pic.twitter.com/UkBdGDiaW1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2017
Sweet shop in Lucknow campaigns for BJP by making 'Modi jalebis' and 'Kamal jalebis' #uppolls2017 pic.twitter.com/TJq1JdAMM8
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2017
देशातील पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सर्व पक्ष जाहीर प्रचारसभा, रोड शो, सोशल मीडियावरून जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे रोड शो सुरू आहेत. जाहीर प्रचारसभा घेण्यात येत आहेत. तर भाजपकडून नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांसारख्या दिग्गजांनी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडवला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी यापूर्वी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रचार केला आहे. ‘करण-अर्जुन आ रहे है’ अशा आशयाचे बॅनर झळकावले होते. आता भाजप समर्थकांनीही हटके प्रचार सुरू केला आहे. लखनऊमध्ये भाजपचा समर्थक असलेला एका मिठाईच्या दुकानाच्या मालकाने प्रचारासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ‘मोदी जिलेबी’ आणि भाजपचे चिन्ह असलेल्या ‘कमळा’च्या प्रतिकृतीची जिलेबी तयार करून प्रचार सुरू केला आहे. ही ‘मोदी जिलेबी’ प्रचाराच्या रणधुमाळीत हिट ठरत आहे, असा दावा भाजपचे समर्थक करीत आहेत.