लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. २० मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानाकरता आज प्रचारसभा थंडावतील. त्यामुळे आज प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे. दरम्यान, काल (१७ मे) दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि बीकसेतीली नेस्को ग्राऊंडवर महायुती आणि महाविकास आघाडीची अनुक्रमे सभा पार पडली. या सभा म्हणजे सांगता सभा होत्या. दोन्हींच्या व्यासपीठावर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची एक आठवणही शेअर केली.

तुषार गांधी यांनी मराठीतून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, “मी मराठीत बोलतो कारण माझी आई महाराष्ट्रीय आणि वडील गुजराती होते. म्हणून मी खराखुरा मुंबईकर आहे. दोन्ही वारसे मला मिळाले आहेत. पण जेव्हा जाहीरपणे बोलायचं असेल तर मी हिंदीत बोलतो.”

“ही एक अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, जेव्हा व्यासपीठावर सर्व राजकीय नेते बसलेले आहेत. त्यांच्यासमोर नागरिकांच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्याला बोलण्याची संधी दिली. यातून हे सिद्ध होतंय की या आघाडीतून नागरिकांचं समर्थन कोणत्या मर्यादेपर्यंत प्राप्त आहे”, असंही तुषार गांधी म्हणाले.

हेही वाचा >> मोदींना हटविल्याशिवाय हा ‘भटकता आत्मा’ स्वस्थ बसणार नाही! शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

प्रबोधनकार ठाकरेंमुळे माझे आजोबा वाचले होते

“इथं येण्याचं माझं आणखी एक कारण आहे. हे कारण ऐतिहासिक आहे. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं माझ्या कुटुंबावर मोठे उपकार आहेत. महात्मा गांधींची विदर्भात हत्या करण्याचा कट रचला होता. याबाबत प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या सहकाऱ्यांना कळवलं आणि त्यांनी काळजी घेण्यास सांगितलं. तसंच, प्रबोधनकार ठाकरे यांनी इशारा दिला होता की, महाराष्ट्रात गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयत्न थांबवला पाहिजे. त्यामुळे या प्रयत्नांतून माझे पणजोबा वाचले. ठाकरे कुटुंबांचं गांधी कुटुंबावर उपकार आहेत. त्यामळे हे सर्वांसमोर सांगितलंच पाहिजे.

“मी आभार मानण्याची गरज नाही. कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावलं आहे. आणि हीच एक गोष्ट आहे, जी मला या व्यासपीठापर्यंतं घेऊन आली आहे”, असंही तुषार गांधी म्हणाले.

२० तारखेला राजकारणात स्वच्छता अभियान राबवा

“आजही ही हत्यारी विचारधारा आमच्यावर हवी होत आहे. आम्ही त्यांना पूर्वीही हरवलं आहे आणि आताही एकत्रित येऊन हरवू. मशालीचा प्रकाश, तुतारीची गगनभेदी गर्जना तर त्यांच्याबरोबर हाताची ताकद आहे. जो महाराष्ट्राचा एक गौरव होता की फुले, शाहू, आंबेडकरांची भूमी म्हटलं जायचं. पण आता महाराष्ट्राच्या नावासह गद्दारांचंही नाव जोडलं गेलेलं आहे. २० तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छता अभियान चालवायचं आहे. आणि हा कचरा फेकून द्यायचा आहे”, असंही तुषार गांधी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.