राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती ११० हून जागा मिळवत काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आहे. राजस्थानमध्ये भाजपा आल्याने त्या राज्याचा जो प्रत्येक निवडणुकीनंतरचा ट्रेंड आहे तो देखील कायम राहिला आहे. राजस्थान काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीचा फटका काँग्रेसला बसला का? भाजपाने विजय कसा मिळवला या सगळ्या कारणांची मीमांसा होत राहील मात्र भाजपाची सत्ता आल्याने आता मुख्यमंत्री भाजपाचा होणार यात काहीही दुमत राहिलेलं नाही. भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता ही निवडणूक लढवली होती. अशात आता बाबा बालकनाथ आणि दीया कुमारी यांच्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी चुरस आहे. आपण जाणून घेऊ कोण आहेत हे दोघे आणि कुणाचं पारडं किती जड आहे? मुख्यमंत्री पदासाठी दोन प्रमुख दावेदार राजस्थानचं मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे जाऊ शकतं अशा नावांपैकी दोन प्रमुख नावं आहे ती म्हणजे जयपूरच्या राजघराण्याच्या दीया कुमारी आणि योगी बालकनाथ. विद्यमान स्थितीत दोघंही खासदार होते. मात्र या दोघांनाही भाजपाने तिकिट दिलं आणि विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितली. दोघंही निवडून आले आहेत. राजस्थानात मुख्यमंत्रीपदाचे हे दोघेही प्रमुख दावेदार मानले जात आहेत. आता मुख्यमंत्री म्हणून भाजपा कुणाच्या गळ्यात माळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. योगी बालकनाथ यांच्याविषयी राजस्थानच्या राजकारणात योगी बालकनाथ म्हणून प्रसिद्ध असलेले बालकननाथ हे आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण करतात. तिजारा या जागेवरुन ते जिंकून आले आहेत. त्यांच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आले होते. आज तक आणि अॅक्सिस माय इंडिया यांनी जो सर्व्हे केला त्यात जनतेने अशोक गहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती योगी बालकनाथ यांना दिली होती. योगी बालकनाथ ओबीसी असल्याचा भाजपाला फायदा होऊ शकतो योगी बालकनाथ यादव जातीचे आहेत. ओबीसी असल्याने त्यांना जर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर भाजपा इथे ओबीसी कार्ड खेळू शकते. बालकनाथ यांचं यादव असणं उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला फायदेशीर ठरु शकत. उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणी यादव वर्गाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. लोकसभा निवडणुकीत जर बालकनाथ यांनी भाजपाचा प्रचार केला तर लोकांची मतं भाजपाला जास्त प्रमाणात मिळतील तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये समाजवादी पक्ष आणि राजद यांना कमकुवत करण्यासाठीही बालकनाथ यांच्या प्रचाराचा फायदा होऊ शकतो. बालकनाथ हे कट्टर हिंदुत्ववादी योगी बालकनाथ यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. काँग्रेसला पसंती न देता भाजपाची निवड राजस्थानने केली आहे. याचा अर्थ हिंदुत्वाचं कार्डही राजस्थानात चाललं आहे. कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेल्या योगी बालकनाथ यांना जर मुख्यमंत्री केलं गेलं तर भाजपाला त्याचा फायदा होऊ शकतो. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा एक प्रबळ नेता कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिलं जातं. भाजपा योगी आदित्यनाथ यांना विविध राज्यांमध्ये प्रचारासाठी पाठवत असते. राजस्थानमध्ये बालकनाथ यांना निवडलं गेलं तर योगींप्रमाणे कट्टर हिंदुत्वाचा आणखी एक चेहरा भाजपाला मिळणार यात शंका नाही. बालकानाथ यांची ही सकारात्मक बाजू असतली तरीही राजस्थानच्या जातीय राजकारणात ते मिसफिट आहेत. ओबीसी व्होटबँक नावाचा काही प्रकार अद्याप राजस्थानात आलेला नाही. या ठिकाणी गुर्जर आणि जाट व्होट बँक आहे. त्यामुळे राजस्थानात त्यांच्या ओबीसी असण्याचा फार फायदा होणार नाही. दीया कुमारी यादेखील मुख्यमंत्रिपदाचा दावेदार राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समांतर दीया कुमारी यांना उभं करण्यात आलं आहे. याचाच अर्थ असा आहे की पक्षाला वसुंधरा राजेंच्या ऐवजी नवं नेतृत्व तयार करण्याची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभेतही दीया कुमारी यांचं नाव घेतलं होतं. त्यावरुन राजस्थानातली त्यांची राजकीय ताकद लक्षात येते. डिसेंबर २०१८ मध्ये अमित शाह हे दीया कुमारी आणि त्यांची आई पद्मिनी यांच्या जयपूरच्या निवासस्थानी पोहचले होते तेव्हापासूनच दीया कुमारी यांचं भविष्य उज्वल असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता त्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये राहणार की बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा जयपूरच्या राजघराण्याच्या महाराणी दीया कुमारी यांनी अनेकदा दावा केला आहे की त्या श्रीरामाचे पुत्र कुश यांची ३९९ वी पिढीतल्या आहेत. त्यांचे वडील भवानी सिंह १९७१ भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवला होता. दीया कुमारी या हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यावर आपले विचार मांडत असतात. एकदा त्यांनी ताजमहाल हा आमच्या घराण्याच्या मालकीचा आहे असंही म्हटलं होतं. तसंच आमच्याकडे तसे दस्तावेज आहेत असाही दावा केला होता. आज तकने हे वृत्त दिलं आहे. वसुंधरा राजे यांना भाजपाने काहीसं साईडलाइन केलं आहे. ज्यामुळे मागच्या वेळी सत्ता येता येता निसटली होती. अशात राजपूत मतं मिळवायची असतील तर दीया कुमारी यांचा चेहरा उपयोगात येऊ शकतो. महाराणी गायत्री देवी यांचा वारसाही दीया कुमारी यांच्याकडे आहे. भाजपा त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन राजपूत समाजाला एक वेगळा संदेश देऊ शकतो. दीया कुमारी यांच्याविषयी या सकारात्मक बाजू असल्या तरीही एक नकारात्मक बाजू आहे ती अशी की त्यांच्याकडे राजस्थानसारखं मोठं राज्य चालवण्याचा अनुभव नाही. राजघराण्याचे लोक हे जनतेशी त्या प्रमाणात कनेक्ट होऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री पद असं असतं जे सरकार, पक्ष, केंद्रीय नेतृत्व यांच्यात समन्वय साधता येईल. त्यामुळे आता दीया कुमारी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार की योगी बालकनाथ मुख्यमंत्री होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.