28 January 2021

News Flash

समजून घ्या, सहजपणे… भारतातील कोविड विरोधी औषधांचा वापर

जाणून घ्या भारतातील कोविड-१९ रुग्णांसाठी कुठल्या औषधांचा वापर शक्य आहे

संग्रहित छायाचित्र

– राजेंद्र येवलेकर

रेमडेसीवीर – हे विषाणूविरोधी औषध २०१४ मध्ये इबोलाविरोधात तयार केले होते. ते कोविड-१९ विरोधातील एक प्रमुख औषध म्हणून वापरले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. या औषधामुळे विषाणूची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी होते.

गेल्या महिन्यात यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस या संस्थेने या औषधाचे प्राथमिक चाचणी निष्कर्ष जाहीर करण्यात आले. कोविड रुग्णात या औषधामुळे १५ दिवसांऐवजी ११ दिवसात फरक दिसून येतो. भारतीय औषध महानियंत्रकांनी एक जून रोजी पाच दिवसांच्या रेमडेसीवीर उपचारास परवानगी देण्यात आली. अतिशय गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांमध्ये या रेमडेसीवीर औषधाचा वापर केला जातो. नेमक्या कुठल्या टप्प्यावर हे औषध द्यायचे याचा विचार डॉक्टरांना करावा लागतो असे मत संसर्गजन्य रोग तज्ञ ओम श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. रेमडेसीवीर औषधाची एक कुपी १० ते २० हजार रुपयांना मिळते. गिलीज सायन्सेस यांनी सिप्ला, फिरोसन लॅब, हेटेरो लॅब, ज्युबिलंट लाइफसायन्सेस व मायलान यांच्याशी या औषधाच्या उत्पादनासाठी करार केला आहे.

फॅविपीरावीर – हे औषध विषाणूविरोधी औषध आहे. त्यामुळे विषाणूंची संख्या शरीरात वाढत नाही. ते इन्फ्लुएंझावरचे औषध आहे त्याचे उत्पादन पहिल्यांदा फुजीफिल्म टोयामा केमिकल लि. या जपानी कंपनीने केले होते. त्याचे उत्पादन भारतात ग्लेनमार्क, व स्ट्राइडस फार्मा या कंपन्या करतात. लक्षणे दाखवणाऱ्या व गंभीर रुग्णांसाठी या औषधाचा वापर करतात. रुग्णालयांनी या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या आहेत त्या मध्यम व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर घेण्यात आल्या. ग्लेनमार्क या कंपनीने फॅविपीरावीर व युनिफेनोवीर या औषधांच्या चाचण्या १५८ लोकांवर घेण्याचे ठरवले आहे.

टॉसिलीझुमाब – हृदयाच्या संधीवातावर हे औषध वापरतात. त्यात प्रतिकारशक्ती वर काम केले जाते. मुंबईत १०० गंभीर रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला. त्याची किंमत ४० ते ६० हजार रुपये आहे. सरकारी रुग्णालयात ते मोफत दिले जाते. त्यामुळे रुग्ण व्हेन्टिलेटरवर जात नाही असे म्हणतात. लिलावती रुग्णालयात या औषधाची चाचणी ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आली. कारण तो गंभीर आजारी होता. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी अजून तरी या औषधाच्या उपयुक्ततेबाबत सांगता येत नाही. सरकारी रुग्णालयात ९५ टक्के रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. लिलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांच्या मते हे औषध ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांना दिले जाते. भारतात त्याच्या चाचण्या अनेक केंद्रात सुरू झाल्या आहेत हे औषध रोश फार्मा तयार करते व त्याचे विपणन सिप्ला कंपनी करते. अक्टेमरा नावाने ते बाजारात आहे.

आयटोलिझुमॅब – हे सोरायसिस या त्वचारोगावरचे औषध आहे त्याचा वापर हृदयाचा संधीवात व इतर अटोइम्युन रोगात करतात. बायोकॉनने भारतात हे २०१३ मध्ये ते सुरू केले. मुंबई व दिल्लीत काही रुग्णांवर त्याचा वापर करण्यात आला. अजूनही त्याच्या चाचण्या चालू आहेत.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन – हे मलेरियाविरोधी औषध असून त्याचा वापर कोविड-१९ रुग्णांवर करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने तूर्त तरी या औषधाच्या चाचण्या थांबवल्या आहेत. लॅन्सेट नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध अलिकडे मागे घेतला आहे. या औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन भारतात होते. भारताने अमेरिकेला त्याचा पुरवठा केला होता. मुंबईतील भाटिया रुग्णालयाच्या डॉ. गुंजन चंचलानी यांच्या मते या औषधाने रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. काही नकारात्मक अहवाल आल्यानंतर त्याचा वापर कमी करण्यात आला.

डॉक्सीसायक्लिन व इव्हरमेक्टिन – डॉक्सिसायक्लिन हे प्रतिजैविक असून त्याचा वापर मूत्रमार्गावरील संसर्गावर केला जातो. श्वसन रोगातही संसर्गावर त्याचा वापर केला जातो. इव्हरमेक्टीन हे परोपजीवी जंतू विरोधातील औषध आहे. त्याचाही वापर कोविड-१९ वर केला जातो. मे महिन्याच्या मध्यावधीत बांगलादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये साठ रुग्णांवर या औषधाचे उपचार करण्यात आले.मोनाश बायोमेडिसीन संस्थेत यावर प्रयोग करण्यात आले त्यात इव्हरमेक्टिन हे औषध ४८ तासात विषाणूला मारते असे दिसून आले. या दोन औषधांच्या कोविड-१९ रुग्णांवरील परिणामांबाबत फार माहिती नाही असे कोविड प्रतिसाद दलातील डॉ. नितीन कर्णिक यांनी सांगितले.

रिटोनाविर व लोपिनाविर – या विषाणूविरोधी औषधाचा वापर एचआयव्ही रुग्णांवर केला जातो. त्या औषधांवर चाचण्या सुरू असून काही अभ्यासानुसार त्यामुळे कोवि़ड-१९ रुग्णांची मृत्यूची जोखीम कमी होते. काहींच्या मते त्याचा काही परिणाम होत नाही. डॉक्टर काही वेळा गंभीर रुग्णांवर या दोन औषधांचा वापर करतात. काही डॉक्टरांच्या मते या औषधांचा चांगला उपयोग होतो.

रक्तद्रव उपचार – रक्तद्रव उपचाराचा वापर ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी कमी असते त्यांच्यावर केला जातो या रुग्णांमध्ये सायटोकिन स्टॉर्ममुळे परिस्थिती बिघडत जाते. जे रुग्ण गंभीर असतात त्यांना बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव दिला जातो त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. आयसीएमआरच्या मते जिथे योग्य असेल तिथेच ही उपचार पद्धती वापरण्याची गरज आहे. श्वसनास त्रास व सायटोकिन स्टॉर्म यामुळे ज्यांच्यात लक्षणे तीव्र होतात त्यांच्यात याचा वापर केला जातो. यात पुरेसे प्रतिपिंड असलेला रक्तद्रव दात्याकडून घ्यावा लागतो त्यासाठी रक्तगट जुळणेही महत्वाचे आहे.

(एक्स्प्रेस एक्स्प्लेन्डवरून अनुवादित)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 11:36 am

Web Title: explained use of drugs against covid 19 in india
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या, सहजपणे… डोनाल्ड ट्रम्प यांना नेण्यात आलेल्या ‘त्या’ बंकरची गोष्ट
2 समजून घ्या, सहजपणे… आर्सेनिकम अल्बम कितपत उपयोगी
3 समजून घ्या सहजपणे : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?
Just Now!
X