News Flash

समजून घ्या : रेड अलर्ट म्हणजे काय?; तो कधी जारी करण्यात येतो?

हवामान खात्याने पुढील ४ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केल्याने शहरामध्ये रेड अलर्ट जारी केला असून यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आलंय

पुढील चार दिवसांमध्ये काही ठिकाणी ३०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय.

मुंबईमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारपासून शनिवारपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाल आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केलीय. काही ठिकाणी तर ३०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला आणि यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत. त्यातच रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यावर प्रशासनाचा भर असेल. पण रेड अलर्ट जारी केला म्हणजे काय केलं? रेड अलर्ट म्हणजे काय? तो का, कधी, कसा जारी करतात? त्याचा अर्थ काय होतो हे अनेकांना ठाऊक नसते त्याचाच घेतलेला हा आढावा.

नक्की वाचा >> समजून घ्या : ६० मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती? पाऊस कसा मोजतात?

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्सचा अर्थ…

ग्रीन अलर्ट –
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्यपणे यल्लो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर केला जातो.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो.. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

नक्की पाहा >> Kurla ची देशभरात चर्चा; पावसाबरोबर बाबू भैय्या, मोदी, रेणू शहाणे, जॉन लिव्हरच्या Memes चाही पडला पाऊस

ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो.. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एकाद्या विशिष्ट प्रदेशातील (राज्य, शहर, तालुका, जिल्हा) नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते. हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं अपेक्षित असतं. अधिक धोकादायक आणि तिव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली, परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 4:59 pm

Web Title: explained what is red alert mumbai rain alert severe weather warning scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : ६० मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती? पाऊस कसा मोजतात?
2 समजून घ्या : देशामधील करोना संसर्गाचा वेग एवढ्या झपाट्याने का कमी होतोय?
3 समजून घ्याः भारतातच का वाढत आहे काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव?
Just Now!
X