सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा आलेखही वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. कधी अचानक करोनाबाधितांची संख्या अधिक असते तर कधी त्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात करोनाबाधित आढळून येतात. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अनेकांना ही लस नक्की येणार तरी कधी हा प्रश्न नक्कीच पडलाय. करोनावरील लस नक्की केव्हा उपलब्ध होईल याचं उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरिस करोनावरील दोन लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर होण्याचीही शक्यता आहे.

मार्च २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत करोनाची लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे, परंतु औषधनिर्माणकर्ते त्यांच्या काही गणितांबद्दल अधिक महत्त्वाकांक्षी आहेतय मॉडर्ना इंक सारख्या काही कंपन्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना देण्यासाठी या वर्षाच्या अखेरिसच आपली लस उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तर फायझरदेखील याच महिन्यात अमेरिकेतील एफडीएच्या मंजुरीसाठी अर्ज दाखल करू शकतो, असं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे.

लस येणार कधी ?

जगभरात सध्या वैद्यकीय किंवा वैद्यकीय पूर्व १८२ लसींच्या चाचण्या सुरू आहेत. यापैकी ३६ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. तर ९ लसी मानवी चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. भारतातही दोन लसींची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तर ऑक्सफर्ड लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तसंच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं यापूर्वी आरोग्य मंत्रालयानंदेखील म्हटलं होतं. अमेरिकेत सध्या मॉडर्ना या लसीची ३० हजार स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लसीच्या सुरक्षेबाबत खात्री झाल्यावर २५ नोव्हेंबरनंतर लसीच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी घेणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.


“२५ नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे आपात्कालिन परिस्थितीत लसीच्या वापरासाठी एफडीएची मंजूरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेला डेटा उपलब्ध असेल,” अशी माहिती मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन बॅन्सेल यांनी फोर्ब्सशी बोलताना सांगितलं. तसंच २०२१ च्या पहिल्या तिमाहित किंवा दुसऱ्या तिमाहिच्या सुरूवातीपर्यंत मंजुरीची अपेक्षा करता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या मॉडर्नाच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील अधिक वयाच्या (५५ वर्षांवरील) व्यक्तींवर करण्यात आलेल्या चाचणीचे निकालही सकारात्मक आले असून त्यांच्या उत्तम प्रतिकारशक्तीही तयार झाल्याचं दिसून आलं आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असं नमूद केलं आहे की वृद्ध स्वयंसेवकांना दिलेल्या लसीनंतर त्यांच्यात तयार झालेली प्रतिकारशक्ती तुलनेत कमी वयोगटातील स्वयंसेवकांइतकीच होती. तसंच लसीकरण केलेल्या स्वयंसेवकांच्या रक्तात SARS-CoV-2 च्या विरोधातील न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडिजही तयार झाल्या होत्या.

फिझरची लस

फिझर ही कंपनी जर्मनीची कंपनी बायो-एन-टेक एसई या कंपनीसोबत मिळून करोनावरील लस विकसित करत आहे. दरम्यान, ही लस सुरक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी आणि प्रभवी ठरली तर हे वर्ष संपण्यापूर्वी अमेरिकेत वितरित करण्याची योजना आखल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली होती. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस या लसीच्या चाचण्यांचा अहवाल एफडीएकडे सादर केला जाणार आहे. जर एफडीएनं लसीला परवानगी दिली तर या लसीच्या लाखो डोसचं उत्पादन याच वर्षी केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


ऑक्सफर्ड लस

द टाईम्सच्या वृत्तानुसार, ऑक्सफर्ड लसीला ख्रिसमसपर्यंत युनाडेट किंगडममध्ये आवश्यक ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसंच परवानगी मिळाल्यानंतर ही लस उपलब्ध होण्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो. असंही टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे. तसंच या लसीबद्दल तज्ज्ञांनाही अपेक्षा आहेत.

जॉन्सन अँड जॉन्सन लस

जॉन्सन अँड जॉन्सन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असूव ६० हजार स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान. या चाचणीचा अहवाल या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. जर अहवाल सकारात्मक असेल तर त्याच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी मागितली जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे पुढील वर्षी १ अब्ज डोस उपलब्ध करण्याची तयारीही जॉन्सन अँड जॉन्सनकडून करण्यात येत आहे.


रशियन लस

करोनावरील लसीला मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान, येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या दुसऱ्या एपिवॅक करोना या लसीलाही रशिया मंजुरी देण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या टप्प्यात १० हजार डोस तयार करण्याची योजना आखण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यापासून याचं उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.