भारतातील करोनाची स्थिती हळूहळू सुधारते आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत देशात जी करोनारुग्णांची संख्या होती ऑक्टोबर महिन्याच्या २२ तारखेपर्यंत ही संख्या तीन लाखांनी कमी झाली आहे. विशेष बाब ही की १७ सप्टेंबरनंतर अवघ्या पाच दिवसांनीच म्हणजेच २२ सप्टेंबरपासून करोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला देशभरात ५६ हजार नवे करोना रुग्ण आढळले होते. तर ८० हजार रुग्ण देशभरात बरे झाले. देशभरात सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांची म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाख १५ हजारांच्या आसपास आहे. ही संख्या मागील महिन्यात १० लाखांच्या पुढे गेली होती.

देशभरात करोना रुग्णांची जी संख्या कमी होते आहे त्यातले जवळपास अर्धे रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. मागील महिन्यात महाराष्ट्रात ३ लाख केसेस अॅक्टिव्ह होत्या जी संख्या आता १ लाख ५० हजारांवर आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेशातही करोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहण्यास मिळाली आहे. आंध्र प्रदेशातली मागील दीड महिन्यात सक्रिय रुग्णांमध्ये जवळपास ७० टक्के घट झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंध्र प्रदेशात करोनाचे १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण अॅक्टिव्ह होते. आता ही संख्या कमी होऊन ३२ हजारांवर आली आहे. गेल्या आठवड्यापासून आंध्र प्रदेशात दर दिवशी पॉझिटिव्ह आढळणारे रुग्ण हे ४ हजार किंवा त्यापेक्षा कमी झाले आहेत. कारण मागच्या आठवड्याच्या आधी १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते.

मागच्या एका आठवड्यात दिल्ली आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचा अपवाद वगळला तर देशातील प्रत्येक राज्यात करोना रुग्णांमध्ये घट पाहण्यास मिळाली आहे. केरळमध्ये करोनाच्या केसेस वाढत होत्या मात्र इथेही गेल्या आठवड्यांपासून पॉझिटिव्ह केसेसमध्ये घट पाहण्यास मिळाली आहे बिहारमध्येही करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याच्या तुलनेत बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये करोना रुग्णांचं प्रमाण गेल्या आठवड्याभरापासून वाढताना दिसतं आहे. दिल्लीत करोना रुग्ण वाढण्याच्या हा तिसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात साधारण २ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असत. आता तिसऱ्या टप्प्यात ही संख्या प्रतिदिन ३ हजार रुग्णांच्या आसपास गेली आहे. बुधवारी दिल्लीत ३ हजार ७०० नवे करोना रुग्ण आढळले. ही संख्या २५ सप्टेंबरपासून आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे.

पश्चिम बंगालमध्ये मागील ४५ दिवसांचा विचार केला तर दररोज ३ ते ४ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. देशाचा विचार केला तर बुधवारी केरळमध्ये सर्वाधिक म्हणजेच ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. केरळमध्ये बुधवारच्या आकडेवारीनुसार ९३ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकंदरीत करोना रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा अपवाद वगळता सगळ्याच राज्यांमध्ये घट पाहण्यास मिळाली आहे आणि त्यामुळेच देशातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. ज्यामुळे देशाचा रिकव्हरी रेटही वाढला आहे.