News Flash

ममता बॅनर्जी कशा झाल्या जखमी?, नंदीग्राममध्ये नेमकं काय घडलं?

कुणी व कधी केला हल्ला?

नंदीग्राम येथे झालेल्या घटनेत जखमी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. (छायाचित्र/पीटीआय)

पश्चिम बंगालला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले तेव्हाच ही निर्विघ्न पार पडणार नाही, अशीच चिन्हं दिसत होती. बंगालमधील निवडणुकीत हिंसा जणू प्रचाराचं बोट धरूनच येते. आताच्या निवडणुकीतही आणखी हिंसक घडणार हे दिसू लागलं आहे. आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला आणि आता ममता बॅनर्जी! या दरम्यान बऱ्याच हिंसक घटना घडल्या. दोन्ही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या हत्याही झाल्या. पण ऐन निवडणुकीच्या काळात बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याने बंगालचं राजकारण तापलं आहे.

विशेषतः ममता बॅनर्जी यांनी तृणमूलमधून भाजपात गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध दंड थोपटल्यानंतर पश्चिम बंगाल निवडणुकीचं केंद्र बनलेल्या नंदीग्राममध्येच ममतांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. नंदीग्राम ममतांचे सहकारी असलेल्या सुवेंदू यांचा बालेकिल्ला. याच मतदारसंघात ममता-सुवेंदू हे आमने-सामने आले आहेत.

ममता बॅनर्जी कशा झाल्या जखमी?, कुणी केला हल्ला?

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ममतांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी ममतांनी प्रचार रॅलीही काढली. या रॅलीदरम्यानच ममतांवर हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेविषयी तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी माहिती दिली. “सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास ममता बॅनर्जी या एका मंदिरात पूजा करून बिरुलिया अंचलमधून निघणार होत्या. त्याचवेळी काही अज्ञात लोकांनी त्यांना गाडीत ढकलून दिलं आणि जबरदस्ती दरवाजा बंद केला. यात त्यांच्या डाव्या पायला गंभीर इजा झाली आहे. त्याचबरोबर त्यांना कमरेतही त्रास जाणवत असून, कोलकाताला हलवण्यात आलं आहे,” असं खासदार रॉय यांनी म्हटलं.

तर या घटनेविषयी स्वतः ममता बॅनर्जी यांनीही माध्यमांना माहिती दिली. “नंदीग्राममध्ये माझ्यावर हल्ला केला गेला. माझा पाय गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला,” असं ममतांनी या हल्ल्यानंतर म्हटलं. ३ ते ४ लोकांनी हल्ला केल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, हल्ला नेमका कुणी केला हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आता यावरून राजकारण तापलं आहे.

भाजपा-काँग्रेस हल्ल्याबद्दल काय म्हणाले?

ममतांवर झालेल्या हल्ल्यानंतर कोलकातासह राष्ट्रीय राजकारणाचं केंद्र असलेल्या दिल्लीतही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपा आणि काँग्रेसनंही या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. “बंगालमध्ये पायाखालची जमीन सरकली असल्याने ममता बॅनर्जी यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हे केलं आहे. त्या नाटक करत आहेत,” असं पश्चिम बंगाल भाजपाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर “ममता बॅनर्जी यांच्यावर कुणी हल्ला केला? जर खरंच त्यांना धक्का दिला गेला वा हल्ला केला गेला आहे, तर पोलीस त्या व्यक्तींना अटक का करत नाहीये?” असा सवाल भाजपाचे पश्चिम बंगालमधील खासदार अर्जून सिंह यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा नेत्यांप्रमाणेच काँग्रेसनंही या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. “ममतांना नाटकं करण्याची सवय आहे. ममता एक नेत्याचं नाहीत, तर मुख्यमंत्री पण आहेत. पण आश्चर्याची गोष्ट आहे की, मुख्यमंत्री असूनही जेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो, तेव्हा एकही पोलीस तिथे उपस्थित नव्हता. कुणी आजूबाजूलाही नव्हतं. मग यावर काय म्हणायचं की, बंगालच्या मुख्यमंत्र्यांसोबत बंगालचे पोलिसही नाहीत. यावर कुणाचा विश्वास बसेल का?,” अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 11:45 pm

Web Title: west bengal assembly election how mamata banerjee injured in nandigram who attacked on mamata bmh 90
Next Stories
1 समजून घ्या : ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील फरक
2 समजून घ्या : इम्रान खान यांचं पंतप्रधानपद धोक्यात आणणारा वादग्रस्त कायदा नक्की आहे तरी काय?
3 समजून घ्या : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?, लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?
Just Now!
X