स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी (आयक्यूएअर) या संस्थेच्या अहवालानुसार जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. ती कोणती आणि काय कारणे आहेत प्रदूषणामागची, ते जाणून घेऊ…

हवा गुणवत्ता अहवाल कसा तयार होतो?

स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी (आयक्यूएअर) दरवर्षी हवा गुणवत्ता अहवाल प्रकाशित करते. २०२४ चा अहवाल मंगळवारी ११ मार्च २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आला. हा अहवाल तयार करताना जगभरातील ४० हजार हवा गुणवत्ता निर्देशांक देखरेख केंद्रांच्या माहितीचा आधार घेतला जातो. ही केंद्रे १३८ देशांतील ८,९५४ ठिकाणी आहेत. आयक्यूएअरचे हवा गुणवत्ता शास्त्रज्ञ या डेटाचे विश्लेषण करतात. हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांच्या (पीएम २.५) प्रमाणानुसार हवेची गुणवत्ता ठरते. ती सतत ढासळत असल्यास ते शहर प्रदूषित शहर ठरते.

सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात

या अहवालानुसार, जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे. भारत हा जगातील पाचवा सर्वात प्रदूषित देश आहे.

भारतातील कोणती शहरे?

आसाम राज्यातील आसाम आणि मेघालयच्या सीमेवर असणारे बर्निहाट हे शहर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. इतर शहरांमध्ये दिल्ली, पंजाबमधील मुल्लानपूर, हरियाणातील फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरुग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवडी (हरयाणा-राजस्थान सीमेवरील राजस्थानच्या अल्वर तालुक्यातील शहर), मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे.

जगातील कोणत्या शहरांचा समावेश?

२० शहरांच्या यादीत १३ भारतीय, त्याखालोखाल चार पाकिस्तानी, तसेच कझाकिस्तान, चाड, चीनच्या प्रत्येकी एका शहराचा समावेश या यादीत आहे.

पीएम २.५ म्हणजे काय? त्यांचे दुष्परिणाम कोणते?

पीएम २.५ म्हणजे हवेत असलेले २.५ मायक्रॉनपेक्षा लहान, अतिसूक्ष्म प्रदूषण कण. हे कण मानवी केसांपेक्षा ३० पट लहान असतात आणि ते सहजपणे फुप्फुसात आणि रक्तप्रवाहात शिरकाव करू शकतात. हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते. हवेच्या प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे आयुर्मान अंदाजे ५.२ वर्षांनी कमी होत आहे. अतिसूक्ष्म धूलिकण श्वासोच्छ्वासावाटे फुप्फुसात जातात. तेथे ते साचून राहिल्यामुळे श्वासोच्छवासाशी संबंधित साध्या सर्दी, पडशापासून दम्यासारखे गंभीर आजार, हृदयविकार आणि कर्करोगासारखे गंभीर आजारही होण्याचा धोका असतो.

प्रदूषणाची कारणे कोणती?

वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक कचरा, कार्बन उत्सर्जन, बांधकाम धूळ आणि पिकांचे अवशेष जाळणे ही भारतातील प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. दिल्लीसारख्या शहरी भागात वाहतूक कोंडी, वाहनांच्या इंधन उत्सर्जनामुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांत वाढ होत आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये शेतीतील टाकाऊ कचरा (गव्हाचे पेंढे आदी) जाळल्यामुळे वायू गुणवत्ता खूप खराब होते. या भागातील हवेचा परिणामही दिल्लीवर होतो.

भारतासाठी दिलासादायक बाब कोणती?

भारताची १३ शहरे जगात सर्वाधिक प्रदूषित म्हणून जाहीर झाली असली तरी २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशातील एकूण प्रदूषणात किंचित घट झाली आहे, ही बाब भारतासाठी दिलासादायक आहे. २०२४ मध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. २०२३ मध्ये या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी होता.

२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये सात टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी मात्र आणखी वाढली आहे. तेथे २०२३ मध्ये अतिसूक्ष्म धूलिकण प्रति घनमीटर १०२.४ मायक्रोग्राम होते ते २०२४ मध्ये वाढून १०८.३ मायक्रोग्राम प्रति घनमीटर झाले आहेत.

अहवालातील प्रमुख निरीक्षणे कोणती?

जागतिक शहरांपैकी फक्त १७% शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वायू प्रदूषण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले. १३८ देश आणि प्रदेशांपैकी १२६ (९१.३%) शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अतिसूक्ष्म धूलिकणांसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांची मर्यादा ओलांडली.

  • भारतातील सर्वाधिक प्रदूषित बर्निहाटमध्ये पीएम २.५ चे प्रमाण प्रतिघनमीटरला १२८.२ आहे.
  • जगातील सर्वाधिक प्रदूषित सात शहरे मध्य आणि दक्षिण आशियात आहेत.
  • जगातील सर्वाधिक प्रदूषित नऊ शहरांपैकी सहा भारतात आहेत.
  • आग्नेय आशियातील प्रत्येक देशात पीएम २.५ चे प्रमाण कमी झाले आहे. पण तरीही तेथील धुरके आणि एल निनोची प्रदीर्घ परिस्थिती ही प्रदूषणाच्या प्रमुख कारणांपैकी महत्त्वाची कारणे आहेत.
  • आफ्रिकेत प्रत्येक ३७ लाख लोकांमागे केवळ एकच हवा गुणवत्ता निर्देशांक देखरेख केंद्र आहे. त्यामुळे तेथील हवा गुणवत्ता निरीक्षणे फार कमी आहेत.

Story img Loader