1,300-year-old Buddhist treasure: थायलंड आणि भारतीय संस्कृतीचा ऋणानुबंध हजारो वर्षांचा आहे. भारत हा देश बौद्ध तत्त्वज्ञानाची जन्मभूमी असला तरी, हे तत्त्वज्ञान ज्या ज्या देशांच्या अंगणात वाढले, बहरास आले, त्या देशांच्या यादीत थायलंडचे नाव अग्रणी आहे. केवळ बौद्ध धर्मच नाही तर, भारतीय संस्कृतीच्या अनेक पैलूंना या देशाने आपल्या भूमीत आणि संस्कृतीत सामावून घेतले. अलीकडेच पुरातत्त्व अभ्यासकांना ज्या खजिन्याचा शोध लागला आहे, तो एका बौद्ध मंदिराच्या खाली सापडला आहे.

Wat Thammachak Sema Ram temple (वाट थम्मचक सेमा राम) या मंदिर परिसरात खोदकाम सुरू असताना मंदिराखाली सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच धातूच्या पट्ट्या सापडल्या आहेत. या शोधामुळे थायलंडमधील द्वारावती काळातील कला आणि अध्यात्मिक इतिहासाविषयी अधिकची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या दुर्मीळ वस्तूंवर संशोधन करण्याचे काम थायलंडच्या फाईन आर्ट्स विभागाकडे सोपवण्यात आले आहे. या शोधामुळे थायलंडच्या इतिहासातील एक अज्ञात पर्व समोर येण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

वाट थम्मचक सेमा राम

हे मंदिर थायलंडच्या नखोन रात्चासीमा (Nakhon Ratchasima) या प्रांतात आहे. हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक बौद्ध मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास (इसवी सन ७ वे ते ११ वे शतक) हा द्वारावती कालखंडाशी संबंधित आहे. हा काळ थायलंडमधील प्रारंभिक बौद्ध संस्कृतीचे सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.

या मंदिरातील बुद्ध मूर्ती ही थायलंडमधील सर्वात जुन्या मूर्तींपैकी एक मानली जाते. या मूर्तीच्या जडणघडणीत भारतीय गुप्तकाळातील बौद्ध शिल्पकलेचा प्रभाव जाणवतो, त्यामुळे भारत आणि थायलंड यांमधील प्राचीन धार्मिक तसेच सांस्कृतिक संबंध दृढ असल्याचं दिसून येतं.

प्राचीन विटांचे स्तूप आणि विहारांचे अवशेष

या परिसरातील पुरातत्त्व उत्खननात प्राचीन विटांचे स्तूप, विहारांचे अवशेष व काही शिल्पकृती आणि पुरावस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून, आग्नेय आशियातील बौद्ध कला आणि वास्तुकलेचा मौल्यवान पुरातत्त्व वारसा म्हणून ओळखले जाते. थायलंडच्या इतिहासात वाट थम्मचक सेमा राम मंदिराला एक विशेष स्थान आहे.

Image Credit : The Fine Arts Department

बुद्धमूर्तीखाली सापडलेला दुर्मीळ खजिना

Wat Thammachak Sema Ram temple या मंदिर परिसरात जलनि:स्सारण प्रकल्पाचे काम सुरु होते. त्यासाठी सुरु असलेल्या खोदकामादरम्यान सोनं, चांदी आणि कांस्याच्या प्राचीन वस्तूंचा खजिना सापडला आहे. या वस्तू मंदिरातील निर्वाण निद्रेत असलेल्या बुद्धाच्या मूर्तीखाली सापडल्या आहेत. सुमारे १,३०० वर्षांपूर्वीच्या या खजिन्याचा शोध अपघाताने लागला असून या शोधामुळे पुरातत्त्व अभ्यासक आणि पुरातत्त्व इतिहासप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा शोध अकस्मात लागलला असला तरी पुढे या भागात पुरातत्त्व अभ्यासकांनी उत्खनन सुरू ठेवले. त्यात अनेक नव्या गोष्टी उघड झाल्या आहेत.

Stitched Panorama

सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या कुड्या आणि कांस्याचे कानातले…

या मंदिरात असलेली बुद्धाची मूर्ती तब्बल ४३ फूट लांब असून थायलंडमधील सर्वात जुन्या आणि भव्य मूर्तींपैकी एक मानली जाते. या मूर्तीच्या खाली चार फूट खोलवर हा शोध लागला आहे. सापडलेल्या वस्तूंमध्ये सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या कुड्या आणि कांस्याच्या वर्तुळाकार कानातल्यांची एक जोडी यांचा समावेश आहे. त्या द्वारावती काळातील असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. या मौल्यवान वस्तू अतिशय काळजीपूर्वक पुरण्यात आल्याचे दिसते. त्यामुळेच त्या धार्मिक विधींसाठी वापरल्या जात असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शोधामुळे त्या काळातील सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाबद्दल माहिती मिळते.

द्वारावती काळातील उत्कृष्ट कारागिरीची झलक

सापडलेल्या वस्तूंमध्ये रिपुस्से धातुपत्रे देखील आहेत. हा कला प्रकार सर्वात उल्लेखनीय मानला जातो. हे एक प्रगत तंत्र आहे. यात धातूचा पत्रा ठोकून नाजुक नक्षी आणि प्रतिमा तयार केल्या जातात. सापडलेल्या कलाकृतींपैकी काही सोन्याचा तर काही शिसे-टिन मिश्रधातूपासून तयार केलेल्या आहेत. या पत्र्यांवर बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रांमधील ध्यानस्थ प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रतिमा केवळ धार्मिक भक्तीचे दर्शन घडवत नाहीत, तर द्वारावती काळातील कलाकारांच्या अप्रतिम कौशल्याची साक्ष देतात. रिपुस्से या तंत्रात धातूच्या पत्र्याच्या मागील बाजूने ठोकून पुढच्या बाजूला उठाव असलेली आकृती तयार केली जाते. यासाठी अत्यंत संयम, कौशल्य महत्त्वाचं आहे.

सापडलेल्या वस्तूंमध्ये सुमारे तीन बाय पाच इंच आकाराची आयताकृती सोन्याची पट्टी आहे. या पट्टीवर बुद्धांची प्रवचन देणाऱ्या मुद्रेतली प्रतिमा कोरलेली आहे. या प्रतिमेत बुद्धांच्या डोक्यावर गुंडाळलेले केस, कानाच्या लांब पाळी आणि तेजोवलय (प्रभामंडळ) स्पष्टपणे दिसते. या पट्टीच्या एका कोपऱ्यात लहान छिद्र आहे. त्यामुळे या पट्टीचा वापर गळ्यात घालण्यासाठी किंवा काही विशिष्ट पूजनासाठी केला जात असावा, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात.

थायलंडचा फाईन आर्ट्स विभाग

सध्या सापडलेल्या मौल्यवान वस्तू थायलंडच्या फाईन आर्ट्स विभागाकडे सुपूर्त केल्या आहेत. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या थायलंडच्या फाईन आर्ट्स विभागाने या प्राचीन वस्तूंच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विभागातील तज्ज्ञ सध्या धातूच्या पत्र्यांसह इतर वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. या संशोधनात त्या वस्तूंचा सर्वांगीण अभ्यास करण्यात येत आहे. संशोधक या खजिन्यांचा अधिक सखोल अभ्यास करत असताना द्वारावती काळातील धार्मिक विधी, श्रद्धा आणि जीवनपद्धतीबाबत नवे शोध लागण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

फीमाय नॅशनल म्युझियम: थायलंडच्या प्राचीन वारशाचे रक्षण करणारे केंद्र

बुद्धमूर्तीखाली सापडलेल्या सोन्या-चांदीच्या खजिन्याचे संरक्षण आणि नोंदणी करण्याची जबाबदारी सध्या फीमाय नॅशनल म्युझियमकडे सोपवण्यात आली आहे. आग्नेय आशियाच्या प्राचीन इतिहासाच्या जतनासाठी प्रसिद्ध असलेले हे संग्रहालय या दुर्मीळ वस्तूंचे संवर्धन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या वस्तूंचे योग्यरित्या जतन होऊन पुढील पिढ्यांनाही त्यांचा अभ्यास करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.