Viral 1925 Cartoon Predicting Rise Of India and China: कुठलीही कला ही अभिव्यक्तीचे माध्यम मानली जात असली तरी त्या कलेच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडाविषयी समजण्यास मदत होते. कलाकारच्या स्वानुभवातून कला आकारास येते असे मानले जाते. म्हणजेच त्याच्या सभोवतालच्या परिसराचा जो परिणाम त्याच्या जडणघडणीवर झालेला असतो, त्याचीच झलक कुठे न कुठे आपल्याला त्याच्या कलाकृतीतून पाहायला मिळते. म्हणूनच इतिहासकार किंवा पुरातत्त्व अभ्यासक गतकालखंडातील कलाकृतीचा वापर त्या काळाविषयी जाणून घेण्यासाठी करतात. याचाच अनुभव देणारी एक घटना सध्या घडली आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २८ ऑगस्टपासून भारतावर आणखी २५ टक्के म्हणजेच एकूण ५० टक्के आयात शुल्क लावलं जाईल, अशी घोषणा केली. त्यामुळे जागतिक पातळीवर हा विषय चर्चेचा ठरला आहे.
याच संदर्भातील भविष्यवाणी करणारे एक व्यंगचित्र १९२५ साली अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार रॉबर्ट बॉब माइनर यांनी काढले होते. हे व्यंगचित्र आता viral झाले असून त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून भारत आणि चीन भविष्यात महासत्ता ठरू शकतात, असं सूचित केलं गेलं होतं. आज, ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफवाढीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे त्या व्यंगचित्राचा संदर्भ पुन्हा जिवंत झाला आहे आणि त्यातील संदेश नव्या राजकीय-आर्थिक वास्तवाशी अधिक सुसंगत भासत आहे.
कोण होते रॉबर्ट बर्कले बॉब माइनर?
- रॉबर्ट बर्कले बॉब माइनर (१५ जुलै १८८४ – २६ जानेवारी १९५२) हे अमेरिकेतील एक नामांकित राजकीय व्यंगचित्रकार, उदारमतवादी पत्रकार आणि १९२० पासून अमेरिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख सदस्य होते. टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियो येथे जन्मलेल्या माइनर यांनी लहान वयातच आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडले आणि १४ व्या वर्षी काम सुरू केले.
- १९०४ मध्ये त्यांनी San Antonio Gazette मध्ये स्टीरिओटायपिस्ट म्हणून काम करत असताना मोकळ्या वेळेत चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि स्वतःची कलाशैली विकसित केली. पुढे ते St. Louis Post-Dispatch मध्ये चित्रकार झाले. तिथे त्यांनी ग्रीस क्रेयनचा वापर सुरू करून एक वेगळी आणि प्रभावी शैली निर्माण केली.
- १९११ मध्ये New York World मध्ये काम करताना ते अमेरिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे व्यंगचित्रकार ठरले. यानंतर त्यांनी सोशलिस्ट पक्षात प्रवेश केला आणि The Masses, New York Call व The Liberator सारख्या प्रकाशनांसाठी राजकीय आणि सामाजिक संदेश देणारी व्यंगचित्रे रेखाटली.
- पहिल्या महायुद्धातील सैनिकी हस्तक्षेप, महिला मतदानाचा हक्क, कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक अन्याय हे त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रमुख विषय होते.
- १९२० साली ते अमेरिकन कम्युनिस्ट पक्षात सामील झाले आणि Daily Worker या वृत्तपत्राच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली.
- स्पॅनिश गृहयुद्धादरम्यान त्यांनी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून स्पेनमध्ये जाऊन अब्राहम लिंकन बटालिओनच्या आयोजनात मदत केली आणि कमिन्टरनमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले.
- माइनर हे अमेरिकेत ग्रीस क्रेयनचा वापर करणारे अग्रणी व्यंगचित्रकार मानले जातात आणि त्यांच्या शैलीचा प्रभाव बोर्डमन रॉबिन्सन, डॅनियल फिट्झपॅट्रिक आणि रॉलिन किर्बी यांसारख्या अनेक कलाकारांवर झाला. २६ जानेवारी १९५२ रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांच्या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणारा सामाजिक भानाचा आणि राजकीय धारदारपणाचा वारसा आजही तितकाच प्रभावी आहे.

रॉबर्ट यांनी काढलेल्या त्या चित्राचा नेमका अर्थ काय?
१९२५ साली रॉबर्ट यांनी काढलेल्या चित्रात चीन, भारत आणि आफ्रिका अशी लेबले असलेल्या तीन प्रचंड व्यक्ती दिसतात. त्यांनी हात मागे बांधलेले असून त्यांचे डोळे बंद असल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. त्यांच्या समोर अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राज्यवादाचे प्रतीक असलेल्या लहानश्या प्रतिकृती हातात चाबूक धरून उभ्या आहेत. या प्रतिकृती पैसा, शस्त्रे आणि शक्तीच्या माध्यमातून नियंत्रणाचे प्रतीक दर्शवतात. रशियाची एक धूसर आकृती मागून पाहत असते, जी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि भविष्यातील सत्ता संघर्षातील भूमिकेची चाहूल देते.
रॉबर्ट यांनी या चित्रातून नेमका कोणता संदेश दिला?
रॉबर्ट यांचा संदेश साधा पण प्रभावी होता. पाश्चिमात्य राष्ट्रे जगावर राज्य करत होती; कारण त्यांच्याकडे पैसा आणि बंदुका यांची संपत्ती होती, तर चीन, भारत आणि आफ्रिका यांच्याकडे लोकसंख्या, संस्कृती आणि क्षमता यांची संपत्ती होती. या व्यंगचित्रातून त्यांनी असा दिवस कल्पिला होता की, जेव्हा हे झोपलेले देश जागे होतील आणि जागतिक शक्तींचे संतुलन बदलतील.
‘ते जागे होतील’ या कलाकृतीचा अर्थ
स्कार्प्स फ्रॉम द लॉफ्टच्या अहवालानुसार त्या काळात पाश्चिमात्य साम्राज्यवादाने व्यापार, राजकारण आणि उद्योग क्षेत्रावर वर्चस्व गाजवले होते. वसाहतींमधून कच्चा माल आणि स्वस्त मजूर मिळत होते, तर पाश्चिमात्य राष्ट्रांना त्यातून नफा मिळत होता. माइनरच्या व्यंगचित्राने या विद्यमान स्थितीला आव्हान दिले होते आणि लोकसंख्या, कौशल्य आणि सांस्कृतिक सामर्थ्य हे एक दिवस लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यावर मात करू शकतात, हे सुचवले होते.
व्यंगचित्रातील चीन, भारत आणि आफ्रिकेच्या उंचावलेल्या आकृती या दडपून ठेवलेल्या सामर्थ्याचे प्रतीक होत्या, ज्या मुक्त होण्याच्या क्षणाची प्रतीक्षा करत होत्या. त्याउलट, साम्राज्यवादी शक्तींची ठेंगणी उंची आणि चाबकांवरचे अवलंबित्व ही जागृत बहुसंख्याकांचा सामना करताना त्यांची अवस्था कशी असुरक्षित आणि नाजूक आहे, हे अधोरेखित करत होती.
सुमारे १०० वर्षांनंतर, माइनर यांनी सूचित केलेला बदल प्रत्यक्षात आकार घेत आहे:
चीन: कारखान्यापासून जागतिक महासत्तेकडे !
एकेकाळी जगाचा कारखाना म्हणून ओळखला जाणारा चीन आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहनं आणि हाय-स्पीड रेल्वे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तो आघाडीवर आहे. याशिवाय, बेल्ट अँड रोड उपक्रमाद्वारे चीनने आपला आर्थिक आणि भू-राजकीय प्रभाव सातत्याने विस्तारत जागतिक महासत्ता म्हणून आपली छाप अधिक ठळक केली आहे.
भारत: पुढील महासत्ता
२०३० पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या येथे असून ती देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाची मुख्य ताकद मानली जाते. आयटी, सेवा क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानासाठी भारत हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे जागतिक स्तरावर त्याची भूमिका अधिक बळकट होत आहे.
आफ्रिका: भविष्यातील खंड
२०५० पर्यंत आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे २.५ अब्जांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. कोबाल्ट, सोने आणि सुपीक कृषी जमीन यांसारख्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने हा खंड समृद्ध आहे. त्याचबरोबर, झपाट्याने होणारी डिजिटल प्रगती आणि नवनिर्मितीमुळे आफ्रिका जागतिक अर्थव्यवस्थेत आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा भागीदार म्हणून उभा राहत आहे.
जागतिक शक्तीतील बदल
पाश्चिमात्य देश अजूनही मोठा प्रभाव राखून आहेत, पण त्यांच्या हातातील लगाम सैल होत चालला आहे. सत्ता आता फक्त काही मोजक्या देशांकडे केंद्रित राहिलेली नाही. BRICS आणि आफ्रिकन युनियनसारख्या मंचांना वाढती ताकद मिळत आहे. बॉलीवूड चित्रपट, आफ्रोबीट्स संगीत आणि आशियाई नाटकं यांसारखी सांस्कृतिक देणगी जागतिक अभिरुची घडवत आहेत.
माइनरची कल्पना प्रत्यक्षात उतरत आहे.
एक महासत्ता उलथवून दुसरीने सत्ता घेण्याच्या स्वरूपात नव्हे, तर अधिक संतुलित आणि सामायिक जागतिक मंचाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नियंत्रणाची दोरी सैल होत आहे आणि हे “झोपलेले देश” आता पूर्णपणे जागे झाले आहेत.
शंभर वर्षांपूर्वी रॉबर्ट माइनर यांनी काढलेल्या एका व्यंगचित्रातून सूचित झालेला बदल आज स्पष्टपणे दिसतो आहे. त्या वेळी झोपलेल्या आणि बांधलेल्या अवस्थेत दाखवलेले चीन, भारत आणि आफ्रिका आता जागतिक रंगमंचावर आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रभावी अस्तित्व दाखवत आहेत. सत्ता केवळ पाश्चिमात्य देशांच्या हाती राहिलेली नाही; नव्या महासत्ता होऊ घातलेल्यांनी, प्रादेशिक गटांनी आणि उदयोन्मुख बाजारपेठांनी जागतिक सामर्थ्याचे संतुलन अधिक बहुविध केले आहे. माइनरची कल्पना केवळ भविष्यवाणी नव्हती, तर ती इतिहासाच्या प्रवाहाचा अचूक अंदाज होती