4,000-Year-Old Artefacts Unearthed at Karnataka’s Maski Site: संशोधकांना कर्नाटकातील मास्की येथे प्राचीन मातीची भांडी आणि इतर वस्तूंसह अनेक अवशेष उत्खननात सापडले आहेत. या शोधामुळे येथे असलेल्या विकसित प्राचीन वस्तीचे पुरावेच मिळाले असून, दक्षिण भारतीय इतिहासाच्या प्रारंभीच्या काळातील या प्रदेशाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मास्कीतील मल्लिकार्जुन टेकडी आणि अंजनेय स्वामी मंदिराजवळ सुमारे ४,००० वर्षे जुने मानले जाणारे प्राचीन अवशेष सापडले आहेत. मास्की हे स्थळ आधीच अशोककालीन शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे. या अलीकडच्या उत्खननामुळे दक्षिण भारतातील प्राचीन मानवी इतिहास समजून घेण्यासाठी मास्की पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे.
मास्कीतील आंतरराष्ट्रीय सहकार्य
स्टॅनफर्ड विद्यापीठ (अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. अँड्र्यू एम. बाऊर, मॅकगिल विद्यापीठ (कॅनडा) येथील डॉ. पीटर जी. जोहानसेन आणि भारतातील शिव नाडर विद्यापीठातील संशोधकांकडे या उत्खनन प्रकल्पाचे नेतृत्व आहे. मागील तीन महिन्यांपासून या टीमने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर संशोधनास सुरुवात केली आहे.
इतिहास सरकला इसवी सनपूर्व १४व्या शतकापर्यंत मागे

या टप्प्यात उत्खनन सुरू होण्यापूर्वी संशोधकांच्या टीमने या प्रदेशातील २७१ संभाव्य पुरातत्त्वीय स्थळांची ओळख पटवली होती. सध्या मल्लिकार्जुन टेकडी आणि शेजारील अंजनेय स्वामी मंदिराभोवतीच्या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या शोधामध्ये मास्की येथे दीर्घकालीन मानवी वस्तीचे पुरावे मिळाले असून, या भागातील मानवी वस्तीचा इतिहास इ.स.पू. ११व्या ते १४व्या शतकापर्यंत मागे सरकला आहे.

प्राचीन वस्तीचे पुरावे

मुख्य संशोधकांपैकी कडंबी यांनी सांगितले की, मिळालेल्या अवशेषांमधून मास्की येथे साधारणपणे ४,००० वर्षांपूर्वीपासून अखंड सलग मानवी वास्तव्य असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. या शोधामुळे मास्कीचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, दक्षिण भारतीय प्राचीन संस्कृतींच्या व्यापक समजुतीत भर पडली आहे.

The Minor Rock Edict of Maski confirmed the association of the title "Devanampriya" with Ashoka
अशोककालीन शिलालेख

संशोधकांच्या टीमला या उत्खननात मातीची भांडी, स्वयंपाकासाठीची भांडी आणि कलात्मक वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंमधून सांस्कृतिक पद्धती विकसित करणारा, तांत्रिक कौशल्य असलेला आणि स्थिर जीवन जगणारा एक संघटित समुदाय येथे अस्तित्वात असल्याचे दिसते. मिळालेल्या वस्तूंची विविधता आणि प्रगल्भता सूचित करते की, मास्की हे कधीकाळी संपन्न आणि सुसंघटित समाजाचे केंद्र होते. या उत्खननामुळे भारतातील महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय शोधांच्या वाढत्या यादीत भर पडली आहे.

नवीन शोध आणि भारताचा प्राचीन इतिहास

अलीकडील पुरातत्त्वीय शोध भारताच्या समृद्ध प्राचीन वारशावर प्रकाश टाकतात. तमिळनाडूमधील कीझडी येथे संशोधकांनी २,६०० वर्षे जुनी टेराकोटा पाईपलाईन शोधून काढली आहे, ज्यातून संगम काळातील प्रगत जलव्यवस्थापन आणि नगररचना उलगडते. या शोधामुळे विटकाम, मणीकाम आणि टेराकोटा कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या साक्षर आणि कुशल समाजाचे पुरावे समोर आले आहेत.

अधिचनल्लूर येथे, सुमारे ३,००० वर्षे जुन्या दफनस्थळात सोन्याचा मुकुट आणि इतर वस्तू सापडल्या आहेत, ज्यामुळे प्राचीन दफन विधींवर प्रकाश पडतो. हरियाणातील राखीगढी येथे झालेल्या उत्खननामुळे मानवी वस्तीचा इतिहास तब्बल ८,००० वर्षांपर्यंत मागे गेला असून, आर्य आक्रमण सिद्धांतासारख्या पूर्वीच्या ऐतिहासिक संकल्पनांना आव्हान मिळाले आहे. या सर्व शोधांमुळे भारताच्या प्राचीन संस्कृतींबद्दलची आपली समज अधिक सखोल होते, तसेच त्यांच्या विकसित सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडते.

मास्कीला कसे पोहोचाल?

मास्की येथे रस्ता आणि रेल्वेमार्गाने पोहोचता येते. हे शहर बेंगळुरूपासून सुमारे ४२५ किमी आणि रायचूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करत असल्यास, जवळचे स्टेशन रायचूर जंक्शन आहे, येथून बस आणि टॅक्सीने मास्की गाठता येते. स्वतः वाहनाने प्रवास करत असल्यास, बेंगळुरूपासूनचा मार्ग सरळ आणि सोपा आहे. जवळचे विमानतळ बल्लारी येथे असून ते मास्कीपासून सुमारे १४० किमी दूर आहे.

मास्की हे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. तुंगभद्रेच्या उपनदीवरील मास्की नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचे नाव महासंघ किंवा मासंगीपूर या नावांपासून आले आहे, असे मानले जाते. १९१५ मध्ये सी. बिडन यांनी येथे दुर्गडगुड्डा नावाच्या भागात सम्राट अशोकाचा दगडावर कोरलेला लघु शिलालेख शोधला होता, ज्यामुळे मास्की प्रसिद्ध झाले. या शिलालेखात प्रथमच “अशोक” हे नाव स्पष्टपणे नमूद केले होते; याआधीच्या शिलालेखांमध्ये फक्त “देवानामप्रिय” असा उल्लेख असे. या शोधामुळे भारतीय उपखंडात सापडलेल्या अनेक शिलालेखांचा लेखक सम्राट अशोकच असल्याचे निश्चित झाले. अशा प्रकारे मास्की शिलालेखाने अशोकाच्या कारकिर्दीबद्दल आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दल आधुनिक समज विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मास्कीला मध्ययुगीन दक्षिण भारतीय युद्धांच्या संदर्भातही ऐतिहासिक महत्त्व आहे. सुपीक रायचूर दोआब प्रदेशात वसलेले हे ठिकाण इ.स. १०१९–१०२० च्या सुमारास झालेल्या एका निर्णायक लढाईचे केंद्र होते. याच ठिकाणी राजेंद्र चोल पहिल्याने पश्चिम चालुक्यांचा राजा जयसिंह दुसरा याचा पराभव केला होता. या विजयामुळे हा प्रदेश चोल साम्राज्याच्या वाढत्या प्रभावात समाविष्ट झाला.

मास्कीच्या परिसरात अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत, जी या प्रदेशाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवतात. मास्की शहरातच मास्की अशोक शिलालेख हे एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे. जवळच मल्लिकार्जुन मंदिर हे एक पूजनीय धार्मिक स्थळ आहे.

मास्कीपासून सुमारे ३७ किमी अंतरावर गुरुगुंटा पॅलेस आहे. हा ऐतिहासिक प्रासाद स्थानिक राजांच्या वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे आणि या प्रदेशाच्या राजेशाही इतिहासाची झलक दाखवतो. तुंगभद्रा नदीवरील राजलाबांदा बंधारा हे निसर्गरम्य ठिकाण आहे, जे शांत निसर्गसौंदर्यासाठी आणि स्थानिक सिंचन व्यवस्थेतल्या महत्त्वासाठी ओळखले जाते.

Maski Mallikarjun Temple
मल्लिकार्जुन मंदिर

धार्मिक वारशात रस असणाऱ्यांसाठी हजरत जहीरुद्दीन पाशा दर्गा हे एक महत्त्वाचे सूफी स्थळ आहे, अनेक श्रद्धाळू या ठिकाणी भेट देतात. थोड्याच अंतरावर मुदगल हे प्राचीन मंदिरे आणि समृद्ध इतिहास असलेले गाव आहे, जे कधीकाळी स्थानिक प्रशासनाचे केंद्र होते. या विस्तृत प्रदेशात रायचूर किल्ला अप्रतिम दृश्यांसाठी आणि समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.