देशात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतामधील दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राजस्थानातील फालोदी येथे रविवारी पारा ५० अंशांपर्यंत पोहोचला. या राज्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान संस्थांनी वर्तवली आहे. उत्तर भारतामधील अनेक राज्यांमधील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. विदर्भातही ते सात्याने ४५ अंशांच्या समीप जात आहे. वाढते तापमान आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत, याबाबत घेतलेला आढावा.

उष्णतेच्या लाटांचे वाढते प्रमाण?

सध्या उत्तर व पश्चिम भारतात तापमान तुलनेत जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रदेशासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवरून आणखी वाढून ४७ अंश सेल्सिअसवर स्थिरावण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी पाच ते सहा उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. १९९२ ते २०१५ या काळात भारतात उष्णतेच्या लाटेमुळे २२ हजार ५६२ नागरिकांना जीव गमावला आहे. माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा – Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?

तापमान + आर्द्रता = तापमान निर्देशांक

वातावरणातील तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मनुष्याला त्याचा त्रास होत नाही. त्यानंतर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेण्यास सुरुवात करते. त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ प्रत्यक्ष तापमान ३४ डिग्री सेल्सियस असेल, पण आर्द्रता ७५ टक्के असेल, तर तापमान निर्देशांक ४९ डिग्री सेल्सियस इतका असतो. म्हणजे व्यक्तीला ते तापमान ४९ डिग्री सेल्सियस इतके त्रासदायक ठरते.

नेमका त्रास काय होतो?

दिवसेंदिवस उष्मा वाढत असतानाही नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त सतत उन्हामध्ये फिरत असतात. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून पाणी आणि क्षार बाहेर फेकले जाऊन शरीराचे निर्जलीकरण होण्यास सुरुवात होते. निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण न झाल्यास रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू गरम होऊ लागते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून व्यक्तीला तीव्र झटका येण्याची शक्यता असते. या झटक्याला वैद्यकीय भाषेत ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बॉयसिस’ असे म्हणतात. हा झटका तीव्र असल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. यामध्ये २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असते.

हेही वाचा – पापुआ न्यू गिनीतील भूस्खलनात २ हजार जण ढिगाऱ्याखाली दबले, तरी एक जोडपे वाचले, पण कसे?

उन्हाचा धाेका काय?

डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी प्रमाणात येणे, पिवळी लघवी येणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे या प्रकारचा त्रास उन्हामुळे हाेताे. राज्यामध्ये मागील काही वर्षांपासून उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात २०२२ मध्ये उष्माघाताचे ७६७ रुग्ण आढळले, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर २०२३ मध्ये ४२१ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत २०२४ मध्ये आतापर्यंत २०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे आढळले आहे.