61st Death Anniversary Of Pandit Jawaharlal Nehru: पंडित नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेलं मृत्यूपत्र केवळ एक वैयक्तिक दस्तऐवज नव्हे, तर भारतावरील त्यांच्या गाढ प्रेमाची आणि सांस्कृतिक वारशाबद्दलच्या आत्मीयतेची एक जिवंत साक्ष आहे. मृत्यूनंतरही स्वतःच्या अस्तित्वाचा भारताच्या मातीशी आणि गंगेसारख्या सांस्कृतिक प्रतीकांशी एकरूप होण्याची त्यांची इच्छा म्हणजे त्यांच्या विचारसरणीचं अत्यंत भावनिक आणि प्रतीकात्मक दर्शन आहे. त्यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या मृत्यूपत्रातील निवडक उतारे शेअर करत नेहरूंच्या व्यापक दृष्टिकोनाची आणि विनयशील नेतृत्वाची आठवण करून दिली आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा:
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या मृत्यूपत्रातील काही निवडक उतारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दहा वर्षे आधी हे मृत्यूपत्र लिहिले होते. या मृत्युपत्रात त्यांनी आपल्या अस्थींबाबत एक महत्त्वाची इच्छा प्रकट केली होती. हीच प्रकट केलेली इच्छा रमेश यांनी शेअर केली आहे.
रमेश यांनी शेअर केलेल्या उताऱ्यात म्हटले आहे की, “नेहरूंसाठी भारत एकसंध पण एकाच वेळी विविधतेने नटलेला होता. त्यांच्या संपूर्ण जीवनाचं उद्दिष्ट या एकतेला बळकट करणं आणि सांस्कृतिक विविधतेला आत्मसात करणं हेच होतं. आज या भारताच्या संकल्पनेवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे ती अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला नेहरूंच्या विचारांकडे पुन्हा वळावं लागेल. पंडित नेहरूंनी मृत्यूपूर्वी दहा वर्षे आधी आपली अंतिम इच्छा आणि मृत्यूपत्र लिहिलं होतं. ही एक विलक्षण गद्यरचना आहे.” ते पुढे म्हणाले, “ते इतिहास वाचणारे आणि लिहिणारे काही सामान्य राजकीय नेते नव्हते, तर त्याही पलीकडे ते सौम्य, सुसंकृत, दयाळू आणि विवेकी व्यक्तिमत्व होते. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही नाट्याची गरज नव्हती. जे आपण २६ मे २०१४ नंतर वारंवार पाहतो आहोत.” रमेश यांनी पुढे म्हटले, “नेहरू निर्णायक होते, पण कधीही हुकूमशाही वृत्तीचे नव्हते.”
मृत्यूपत्रात काय म्हटलं आहे?
नेहरूंच्या मृत्यूपत्रात असं म्हटलं आहे की, त्यांच्या अस्थींचा मोठा भाग जिथे शेतकरी राबतात त्या शेतांमध्ये विखुरला जावा आणि थोडा भाग प्रयागराजच्या गंगेत विसर्जन करावा. “माझ्या अस्थींचा मुख्य भाग वेगळ्या प्रकारे विलीन केला जावा. तो विमानातून उंच आकाशात नेण्यात यावा आणि तिथून भारतातील शेतांवर विखुरला जावा, जेणेकरून माझं अस्तित्व त्या मातीत मिसळून जाईल आणि भारतीय भूमीचा अविभाज्य भाग होईल,” असे त्यांनी मृत्युपत्रात म्हटले आहे. “माझ्या अस्थींचा एक मूठभर भाग प्रयागराजच्या गंगेत टाकण्यात यावा जेणेकरून तो महासागराकडे वाहून जाईल,” असं त्यात नमूद केलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. सबळ आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीची भक्कम पायाभरणी केली. सामाजिक न्याय, आधुनिकता, शिक्षण, संविधान आणि लोकशाहीच्या उभारणीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. ‘भारताचा जवाहर’ आणि त्यांचे विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले, “भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली.” शिवाय पुण्यतिथीच्या निमित्ताने नेहरूंना विविध नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते होते. १९४७ साली ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि १६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांचा मृत्यू २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. भारताच्या ‘नॉन-अलाइनमेंट मूव्हमेंट’चे (NAM) शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. मुलांवरील प्रेमामुळे त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या जन्मदिवस १४ नोव्हेंबरला भारतभर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
पंडित नेहरूंच्या शेवटच्या इच्छेतून त्यांचं मातृभूमीशी असलेलं नातं स्पष्ट होतं. त्यांनी स्वतःला केवळ एका नेत्याच्या भूमिकेत न पाहता, भारतमातेच्या मातीशी, शेतकऱ्यांच्या श्रमाशी आणि सांस्कृतिक वारशाशी विलीन होणारा सर्वसामान्य भारतीय म्हणून पाहिलं. त्यांच्या अस्थींबाबतची ही शेवटची इच्छा आजच्या पिढीला एका विचारशील, लोकशाहीनिष्ठ आणि मूल्यप्रधान नेतृत्वाची आठवण करून देते. नेहरूंचं भारताबरोबरच नातं केवळ ऐतिहासिक नव्हतं, तर ते एक सजीव आणि भावनिक बंध होतं.