Abu Dhabi Royal Family Joins TikTok US Deal: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारातून अबू धाबीचं राजघराणं टिकटॉकच्या अमेरिकन व्यवसायात मोठी भागीदारी घेण्याच्या तयारीत आहे. शेख तहनून बिन झायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वाखालील एमजीएक्स (MGX) फंडला १५ टक्के मालकीहक्कासह संचालक मंडळावर एक जागा मिळणार आहे. यूएईच्या राजघराण्याचा सहभाग हा आधीच वादग्रस्त ठरलेल्या टिकटॉक कराराला नव वळण देत आहे, हा करार चीन मंजूर करणार की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अमेरिकन कायदेमंडळाने गोपनीयता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांचा दाखला देत टिकटॉकवर बंदी घालण्यास किंवा विक्री करण्यास मतदान केल्याच्या घटनेला वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. मात्र, यूएई मोठा भागीदार म्हणून समोर आल्यानं वाद निर्माण होऊ शकतो, कारण शेख तहनून हे यूएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही आहेत.
अबू धाबीच्या राजघराण्याची संपत्ती
अबू धाबीचं राजघराणं जगातील सर्वात श्रीमंत घराण्यांपैकी एक मानलं जातं, त्यांची संपत्ती अंदाजे ३२३.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान (एमबीझेड) यांच्या नेतृत्वाखालील नाह्यान घराणं जगातील एकूण तेलसाठ्याच्या सहा टक्क्यांवर नियंत्रण ठेवतं. या घराण्याकडे इंग्लंडमधील नामांकित फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीचे मालकीहक्क आहेत, तसेच रिहानाच्या ‘सॅव्हेज एक्स फेंटी’पासून ते इलॉन मस्कच्या ‘स्पेसएक्स’पर्यंत अनेक जागतिक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.
राष्ट्राध्यक्षांचे भवनच सव्वाचार हजार कोटींचे
राजघराण्याची संपत्ती आलिशान स्थावर मालमत्तेतही दिसून येते. त्यांचा राष्ट्रपती भवन ‘कसर अल वतन’ याची किंमत तब्बल ४७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹४,२१४ कोटी) इतकी आहे. ३,८०,००० चौरस मीटरमध्ये पसरलेला हा राजवाडा पेंटॅगॉनपेक्षा तीन पट मोठा असून, त्यात ३७ मीटर रुंद गुम्बज आणि तब्बल ३.५ लाख क्रिस्टल्सनी सजवलेला झुंबर असल्याचं ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने नमूद केलं आहे.
लंडनचे मालक
या घराण्याकडे परदेशातही भव्य मालमत्ता आहे. पॅरिसजवळील ‘शातो द बायॉं’ (Château de Baillon) ही त्यांचीच मालकी आहे. लंडनमध्ये, अबू धाबीचे दिवंगत शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांना त्यांच्या अफाट मालमत्तेमुळे ‘लंडनचे मालक’ (landlord of London) अशी उपाधी मिळाली होती.
बुगाटी वेरॉनपासून ते लॅम्बोर्गिनी रेव्हेंटॉनपर्यंत- गाड्यांचा अद्भुत खजिना
नाह्यान घराण्याचे गाड्यांचे कलेक्शन जगभरात प्रसिद्ध आहे. यूएई आणि मोरोक्कोतील संग्रहालयांमध्ये त्यांच्या आलिशान गाड्या मांडण्यात आल्या आहेत. याहू फायनान्सनुसार, शेख हमद बिन हमदान अल नाह्यान यांच्याकडे एकट्याच्याच ७०० गाड्या आहेत. शेख मन्सूरच्या ताफ्यात तब्बल पाच बुगाटी वेरॉन्स, फेरारी ५९९ एक्सएक्स, मॅक्लारेन एमसी१२, मर्सिडीज-बेंझ सीएलके जीटीआर आणि लॅम्बोर्गिनी रेव्हेंटॉन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, त्यांच्याकडे फेरारी आणि डेमलर एजीमधलेही हिस्से आहेत. या घराण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात आठ विमानं आहेत, ज्यात एअरबस A320-200 आणि तीन बोईंग 787-9 यांचा समावेश आहे. शेख मोहम्मद बिन झायेद यांच्या वैयक्तिक संग्रहात ४७८ दशलक्ष डॉलर्स किमतीचं बोईंग 747 आणि १७६ दशलक्ष डॉलर्स किमतीचं बोईंग 787 आहे. याहू फायनान्सच्या माहितीनुसार, या विमानांमध्ये एकापेक्षा जास्त केबिन्स, एंटरटेनमेंट सूट्स आणि अगदी स्पा सुविधाही आहेत.
यॉट्स, संग्रहालयं आणि जागतिक प्रतिष्ठा
अबू धाबीचं राजघराणं जगातील सर्वात मोठ्या सुपरयॉट अझ्झामचं मालक आहे. ५९० फूट लांबीचं हे जहाज १०० हून अधिक पाहुण्यांना सामावून घेऊ शकतं. यात गोल्फ रूम, मोत्यांच्या नक्षीकामाची डिझाईन्स आणि समुद्रातही आवाज न करणारे खास झुंबर आहे. याशिवाय, ब्ल्यू आणि टोपाझ (आता A+) ही देखील त्यांच्याच मालकीची असून, जगातील टॉप १० सर्वात मोठ्या यॉट्समध्ये त्यांची गणना होते.
संस्कृतीतील त्यांच्या गुंतवणुकीत लूव्र अबू धाबीचा समावेश आहे. हे फ्रान्सबाहेरील पहिलं आणि एकमेव लूव्र संग्रहालय आहे. २०१७ मध्ये सुरू झालेलं हे संग्रहालय अमूल्य खजिन्यांनी भरलेलं आहे. यात इ.स.पू. ३००० मधील बॅक्ट्रीयन राजकन्येची मूर्ती, पॉल गॉग्विनचं ब्रेटॉन बॉईज रेसलिंग आणि लिओनार्डो दा विंचीचं ‘ला बेल फेरोनियेर’ यांचा समावेश आहे.
टिकटॉकचं १४ अब्ज डॉलर्स मूल्यांकन आणि अमेरिकेची अट
‘द गार्डियन’ने दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉक अमेरिकेतील मूल्यांकन तब्बल १४ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१२,४१,९७ कोटी) इतकं करण्यात आलं आहे. २५ सप्टेंबर रोजी ट्रम्प यांनी या कराराला मान्यता देणारा कार्यकारी आदेश दिला आहे. यात त्यांनी ठामपणे नमूद केलं की, “टिकटॉकची मालकी आणि नियंत्रण अमेरिकन नागरिकांकडे असेल आणि आता कोणत्याही परकीय शत्रू देशाच्या हातात ते नसेल.” ट्रम्प यांनी करारातील सर्व तपशील निश्चित करण्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली आहे. “आमच्याकडे अमेरिकन गुंतवणूकदार आहेत जे टिकटॉक विकत घेऊन चालवणार आहेत, त्यात लॅरी एलिसन (ओरॅकलचे संस्थापक) यांच्यासारखे अनुभवी लोकही आहेत,” असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
अब्जावधींच्या या करारामागचे प्रमुख खेळाडू
- द टेलिग्राफच्या दिलेल्या वृत्तानुसार, लॅरी एलिसनचे ओरॅकल, प्रायव्हेट इक्विटी ग्रुप सिल्व्हर लेक आणि अबू धाबीची एमजीएक्स मिळून टिकटॉक यूएसमध्ये तब्बल ४५ टक्के हिस्सा घेणार आहेत.
- मूळ चिनी कंपनी बाईटडान्सकडे १९.९ टक्के हिस्सा राहील, तर उरलेले शेअर्स बाईटडान्सचे विद्यमान गुंतवणूकदार आणि नवीन भागधारक यांच्यात विभागले जातील.
- ट्रम्प यांनी मायकेल डेल आणि रुपर्ट मर्डोक यांसारख्या मोठ्या नावांचाही सहभाग यात असल्याचं जाहीर केलं, अद्याप संपूर्ण गुंतवणूकदारांची यादी जाहीर झालेली नाही.
- अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी आश्वासन दिलं की, या ‘ब्ल्यू-चिप गुंतवणूकदार गटाची’ संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
- चीनची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तरीसुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांची राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ‘चांगली चर्चा’ झाली असून, त्यांनी या करारासाठी त्यांनी ‘होकार’ दिला आहे.